- विरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, १७ ऑक्टोबर २०२२
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपच्या या माघारीमुळे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीवरून राजकीय घमासान सुरु होते. रमेश लटकेंच्या मृत्युमुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी त्यांच्या पत्न ऋतुजा लटके निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि ऋतुजा लटके यांचा विजय सुकर व्हावा यासाठी भाजपला आवाहन केले होते. यावर भाजपच्या नेत्यांनी चर्चा करून ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मुरजी पटेल हे कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार होते. त्यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, आठवले गट यांची रिपाइं यांचा पाठींबा होता. मात्र केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ठ्राच्या नेतृत्वाने पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ हा निर्णय घेतल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, एखाद्या आमदाराचे निधन होते, तेव्हा साधारणपणे त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळते. अशावेळी आमची संस्कृती आहे की, त्या दिवंगत आमदाराच्या घरातील उमेदवाराला पाठींबा द्यायचा आणि याबाबत भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी पाठींबा देण्याचीच भूमिका घेतलेली आहे. यावेळीही आम्ही तशीच भूमिका घेतली आहे आणि भाजप उमेदवाराचा अर्ज मागे घेवून उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्याविरोधात निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजप, उद्धव ठाकरेची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाटी सुरू केल्यामुळे भाजप, एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि मनसे यांची युती होण्याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांनी राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अनेक राजकीय पक्ष नव्याने भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यामुळे अंधेरीची निवडणूक कमालीची चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरीच्या निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली होती. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे भाजप नेतृत्वाने याबाबत विचार विनिमय करून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला आहे.