- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, १६ ऑक्टोबर २०२२
आमदार रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुक होणार असून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र दिवंगत आमदाराच्या पत्नीविरोधात भाजपने निवडणूक लढवू नये,असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांच्या या आवाहनामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.
कै. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुखापासून त्यांची वाटचाल झाली होती. कै. रमेश लटकेंच्या राजकीय वाटचालीचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या आमदार झाल्यास कै. रमेश लटकेंच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक न लढवता ऋतुजा लटके आमदार होतील, हे पहावे,असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट निवडणूक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत भाजपनेही प्रतिष्ठेची बनविली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेमध्ये नाव आणि चिन्हावरून मोठी लढाई झालेली संपूर्ण देशाने पाहीली आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांनी अतिशय गंभीरपणे घेतली असून एकमेकांविरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र आता मनसेने आपली अधिकृत भूमिका जाहीर करून या पोट निवडणुकीत नवा रंग भरला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आवाहनाला भाजप तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना कसा प्रतिसाद देते हे महत्वाचे ठरेल.