१७ ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, १६ ऑक्टोबर २०२२
महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीसाठी १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. १७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्व या विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे.
वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे
१. ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)
३. राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)
४. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)
५. मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
६. चंदन चतुर्वेदी (अपक्ष)
७. चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)
८. निकोलस अल्मेडा (अपक्ष)
९. नीना खेडेकर (अपक्ष)
१०.पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)
११.फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
१२.मिलिंद कांबळे (अपक्ष)
१३.राजेश त्रिपाठी (अपक्ष)
१४.शकिब जाफर ईमाम मलिक (अपक्ष).
दरम्यान, या निवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा रमेश लटके आणि भाजपचे मुरजी कानजी पटेल यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर भाजपला शिंदे गटाच्या शिवसेनेचा पाठींबा असणार आहे. सध्याच्या राजकीय रणधुमाळीत ही निवडणूक दोन्ही गटाच्या शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार असून या निवडणुकीत लागणाऱ्या निकालावरून भविष्यात जनतेचा कौल नेमका कुणाला मिळेल हे स्पष्ट होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.