नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून मुख्यालयातील विविध विभागांची पाहणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ७ ऑक्टोबर २०२२

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला होता. आज आयुक्तांनी महापालिका मुख्यालयातील प्रत्येक विभागाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी करून मुख्यालयाची रचना व विभागांची व्यवस्था  जाणून घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले तसेच प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयप्रमाणेच मुख्यालयाबाहेरील महापालिका कार्यालयांचीही आयुक्त राजेश नार्वेकर लवकरच पाहणी करणार असून विभागांच्या कार्यालयीन प्रणालीचा व प्रत्यक्ष कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.

आजच्या मुख्यालयातील पाहणी दौऱ्यात आयुक्त नार्वेकर यांनी राजमाता जिजाऊ सभागृह, स्थायी समिती सभागृह व विशेष समिती सभागृह, महापौर दालन व इतर पदाधिकारी यांच्या दालनांचीही पाहणी केली. त्याचप्रमाणे विविध विभागप्रमुखांची दालने, अधिका-यांची दालने, कर्मचारी बैठक व्यवस्था यांची पाहणी करत आयुक्तांनी विदयमान बैठक व्यवस्थेत वाढ करण्याची आवश्यकता आहे काय याबाबतची माहिती जाणून घेतली.

पाहणी दौ-यात मुख्यालयातील स्वच्छता समाधानकारक असल्याचे नमूद करीत स्वच्छता ही नियमीपणे करण्याची बाब असल्याने आपण स्वच्छ शहराचा बहुमान संपादन करतो त्यावेळी आपली कार्यालये नियमीत स्वच्छ राहतील याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. मुख्यालयात येणारे विविध प्रकारचे साहित्य हे व्यवस्थितपणाला व नीटनेटकेपणाला बाधा पोहचणार नाही याची दक्षता घेत योग्य ठिकाणी ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यालयातील सीसीटिव्ही, वातानुकूलन यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था यावर नियंत्रण ठेवणा-या बीएमएस कंट्रोल रुमला भेट देत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तेथील यंत्रणेची बारकाईने माहिती जाणून घेतली. बेसमेंटमधील आपत्कालीन नियंत्रण कक्षाची पहाणी करत दक्षतेने कार्यरत राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरएफआयडी कन्ट्रोल रुमला भेट देत आयुक्तांनी कचरा वाहतुक वाहनांची ट्रॅकींग सिस्टींम जाणून घेतली व त्यांच्या डिजीटल रिपोर्ट्सची व व्यवस्थापनाची पाहणी केली. तळमजल्यावरील आवक – जावक कक्षाची पाहणी करीत त्याठिकाणी पत्रव्यवहाराची ट्रॅकींग सिस्टींम अधिक प्रभावी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.