प्रारूप विकास आराखड्याबाबत जनजागृतीसाठी दशरथ भगत यांचे एकदिवसीय उपोषण

नऊ दिवसांत 12 हजार हरकती दाखल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 5 ऑक्टोबर 2022:

नवी मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखड्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, नागरिकांना समजेल यासाठी  सादरीकरण करावे, प्रभाग निहाय प्रबोधन शिबिरे घ्यावीत यासाठी संपूर्ण नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात मागील नऊ दिवसांपासून नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांनी नवी मंबई बचाओ अभियानांंतर्गत जागर जनजागृतीचा अभियान राबवले आहे. आज दस-याच्या दिवशी या अभियानाच्या शेवटच्या दिवशी दशरथ भगत यांनी वाशी इथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

यावेळी आमदार गणेश नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, राजेश शिंदे, माजी परिवहन समिती सदस्य राजेंद्र इंगळे, विजय वाळुंज, निसर्ग प्रेमी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील नाईक, प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र नेते दिपक पाटील, फशीबाई भगत, वैजयंती भगत,रूपाली भगत यांसह रिक्षा व टॅक्सी महासंघ नवी मुंबई चे विजय पाटील, मारुती कोंडे, सोनखार जेष्ठ नागरिक संस्थेचे सदस्य, वाशी सेक्टर १५-१६ जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे जेष्ठ नागरिक, माथाडी कामगार वसाहती नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी व युवक आणि नवी मुंबई एमआयडीसी क्षेत्रातील झोपडपट्टी भागातील रहिवासी समर्थनार्थ उपस्थित होते.

पालिकेने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्याबाबत दशरथ भगत यांनी छेडलेले अभियान कौतुकास्पद आहे. सिडकोत व पालिकेतही कोरोना काळात काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे, याबाबत आपण विधिमंडळ अधिवेशनात बोलणार असून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल करणार आहोत. सिडकोच्या मनमानी कारभाराबाबत व भूखंड विक्रीबाबत मी तत्कालीन नगरविकास मंत्री जे आज मुख्यमंत्री आहेत त्यांना निवेदन देवून भूखंड विक्री थांबवावी याचे निवेदन दिले होते. मात्र मंत्र्यांचे आदेश डावलून सिडकोने मनमानी केली असून याबातची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देणार असल्याची माहिती आमदार गणेश नाईक यांनी दिली.

  • जागर जनजागृतीचा या नऊ दिवस बेलापूर ते ऐरोली दरम्यान विविध नोड्स मध्ये करण्यात अनोख्या जनआंदोलनाची दखल नवी मुंबई मनपाने घेऊन हरकती व सुचनासाठी मुदतवाढ तत्वतः दिली होती मात्र अद्याप अंमलबजावणी केलेली नाही, संकेतस्थळावर मराठी भाषेत अहवाल प्रसिद्ध केलेला आहे परंतु अद्यापही नकाशे आणि टाकलेले आरक्षण याबाबत प्रभाग (वार्ड) स्तरीय व्यापक जनजागृती व शिबिरे घ्यावीत या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात. नऊ दिवस घेण्यात आलेल्या अभियानात नागरिकांनी जमा केलेल्या एकूण 12 हजार सूचना व हरकती उद्या 6 ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्तांना पालिका मुख्यालयात देण्यात येणार आहे.

हरकती सूचना पत्रांसोबत भगत यांची तुला

उपोषण स्थळी नागरिकांनी जागर जनजागृतीचा या अभियाना अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या प्रारुप विकास आराखड्याबाबत नोंदविलेल्या जमा हरकती सूचना पत्रांची व दशरथ भगत यांची उपोषण स्थळी तुला करण्यात आली. भगत यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांनी आजच्या वाढदिवसानिमित्त हारतुरे व पुष्पगुच्छ न आणता हरकती सूचना आणाव्यात असे आवाहन केले होते, त्यानुसार ही तुला नागरिकांच्या सूचनेनुसार करण्यात आली.  यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक उपस्थित होते.

उपोषण ठिकाणी व्यासपीठावर भगत यांची भेट घेऊन नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या वतीने महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक तथा नगररचनाकार सोमनाथ केकाण आणि वरिष्ठ अभियंता शहाजी परळकर यांनी निवेदन स्वीकारले.

नवी मुंबई मनपाने तब्बल २५  वर्षानंतर  प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. मात्र हा विकास आराखडा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचलाच नाही, तो पोहचावा याचे काहीच नियोजन नाही परिणामी विकास आराखड्यातील तांत्रिक बाबी समजून घेणे सहज शक्य नसल्याने नवी मुंबईकर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे याचा बोध महापालिकेने घ्यावा अशी भावना दशरथ भगत यांनी व्यक्त केली.

जनजागृती अभियान समन्वयक म्हणून निशांत भगत, शैलेश घाग, सचिन शिंदे, उमेश जुनघरे, मनोज महाराणा यांनी काम पाहिले.

——————————————————————————————————