- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 1 ऑक्टोबर 2022
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021- 2022 मध्ये नवी मुंबई महापालिकेला देशातील स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात नवी मुंबई महापालिकेला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. इंदौर शहराने यंदाही देशात प्रथम क्रमांकाचे शहराचा मान मिळवला आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचा मान सुरत शहराला मिळाला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेने उत्तरोत्तर चांगली कामगिरी केली आहे. शहरातील नागरिकांनीही महापालिकेच्या प्रयत्नांना भरीव पाठिंबा दिला. त्यामुळेच स्वच्छ शहराच्या कामगिरीत नवी मुंंबईने देशात तिसरा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
कचरामुक्त शहराचे फाइव्ह स्टार मानांकन आणि ओडीएएफ गटात वॉटरप्लस मानांकन मिळविणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर ठरले आहे.
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते माजी आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त बाबासाहेब राजाळे आदी मान्यवर उपस्थित होते.