नांदेड, वसई विरार, नवी मुंबई, उल्हासनगर महापालिकेत कार्यरत अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, १ ऑक्टोबर २०२२
राज्यात लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पशुसंवर्धन विभागातील प्रतिनियुक्तीवर कार्यरत सात अधिकाऱ्यांना परत माघारी बोलावले आहे. राज्यात सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने तब्बल ४४ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसेच राज्यासमोर असलेल्या विविध समस्यांचा निपटारा जलदगतीने व्हावा यासाठी तातडीने अनेक विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्याही बदल्यांची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदर लम्पी चर्मरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याच्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम तथा प्रतिबंधात्मक उपापयोजना राबविणे गरजेचे आहे. या परिस्थितीत तांत्रिक मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेवून पशुसंवर्धन आयुक्तांनी पशुसंवर्धन विभागातील प्रतिनियुक्तीने इतर विभागातील विविध कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीच्या सेवा लम्पी चर्मरोगाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये परत घेण्याबाबत शासनाकडे विनंती केली आहे. या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागातील प्रतिनियुक्तीने कार्यरत अधिकाऱ्यांच्या सेवा परत घेण्याचा विचाराधीन आहे. त्यानुसार शासन निर्णयामधील तरतुदीस अनुसरून पशुसंवर्धन विभागातील प्रतिनियुक्तीने कार्यरत असणाऱ्या सात अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द केली आहे.