- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, १ ऑक्टोबर २०२२
केंद्र सरकारच्या वतीने इंडियन स्वच्छता लीगमध्ये राष्ट्रीय स्तरावर 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरामध्ये सर्वोत्तम युवक सहभागाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेस मिळाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत अभियानाचे नमुंमपा नोडल अधिकारी बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, परिमंडळ उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार व अमरिश पटनिगीरे यांनी हा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला.
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये ‘युथ वर्सेस गार्बेज’ या टॅगलाईननुसार 53 हजाराहून अधिक युवकांच्या सहभागाने सीबीडी, बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात भव्यतम उपक्रम राबविण्यात आला. त्याचप्रमाणे लीग अंतर्गत एक लाखाहून अधिक नवी मुंबईकर नागरिकांनी ‘नवी मुंबई इको क्नाईट्स’ संघात नोंदणी केली. तरुणाईच्या या उत्स्फुर्त नवी दिल्ली येथील तालकोटरा स्टेडियममध्ये संपन्न झालेल्या स्वच्छ अमृत महोत्सवच्या भव्य समारंभात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.
इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत पामबीच मार्गावर महापालिका मुख्यालय इमारत ते मोराज सर्कल सानपाडा पर्यंत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झळकवत मानवी साखळीच्या माध्यमातून स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात आला. त्यासही बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्सचा बहुमान लाभला. त्याचप्रमाणे यावेळी कांदळवन स्वच्छता मोहीम राबवून तेथून जमा करण्यात आलेला कचरा ६० फूट फ्लेमिंगो रेखाकृतीच्या आत जमा करून पर्यावरणशील दृष्टीकोन जपत फ्लेमिंगो सिटी ही नवी मुंबईची ओळख अधोरेखीत करण्यात आली.
स्वच्छतेमध्ये नेहमीच देशामध्ये आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेला इंडियन स्वच्छता लीगमध्येही सर्वाधिक युवक सहभागाचा १० लाख लोकसंख्येवरील देशातील मोठ्या शहरात प्रथम क्रमांकाच्या शहराचा राष्ट्रीय बहुमान लाभला असून हा नवी मुंबईतील युवाशक्तीचा सन्मान आहे.