नवी मुंबई इंटकची पालिका प्रशासनाकडे मागणी
- अविर वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, २९ सप्टेंबर २०२२
नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणारे कायम सेवेतील कर्मचारी अधिकारी, कंत्राटी कर्मचारी, ठोक मानधनावरील कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी यांना पालिका प्रशासनाने सानुग्रह अनुदान द्यावे यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाने व परिवहन उपक्रमाकडे लेखी पाठपुरावा सुरू केला आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात पालिका आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान तसेच महापालिका परिवहन उपक्रमातील व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांना दिलेल्या निवेदनात महापालिका परिवहन विभागातील ठोक मानधनावरील चालक, वाहक व अन्य कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.
महापालिका आर्थिक स्वरूपात सधन असून अंदाजपत्रकात महापालिकेने तशी भरीव तरतूदही केलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे राज्य व केंद्र पातळीवर नवी मुंबई महापालिकेला सातत्याने विविध पारितोषिकांचा वर्षावही होत आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, ठोक आणि रोजंदारी तत्त्वावर काम करणारे कर्मचारी तसेच महापालिका परिवहन विभागातील ठोक मानधनावरील चालक, वाहक व अन्य कर्मचारी यांना घसघशीत सानुग्रह अनुदान देवून पालिकेने खऱ्या अर्थांने पालकत्व निभावण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.