30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत मुंबईत ‘पर्यटन पर्व’

पर्यटन उत्पादने, पाककृती, वारसा आणि संस्कृती याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 29 सप्टेंबर 2022 :

आयकॉनिक वीक अंतर्गत केंद्रिय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत पर्यटन पर्व – 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय इथं सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत हा कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामुल्य असणार आहे.

महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्य तसेच दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील विविध संस्कृती, कला, हस्तकला आणि पाककृतींचे प्रदर्शन करण्यासाठी मुंबईत पर्यटन पर्व आयोजित केले जात आहे. विविध पर्यटन उत्पादने, पाककृती, वारसा आणि भारताची संस्कृती याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

‘पर्यटन पर्व’ हा देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारित उपक्रम आहे. पंतप्रधानांनी, स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना 2022 पर्यंत सर्व भारतीयांनी भारतातील किमान 15 पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे आवाहन केले होते.

पर्यटन पर्वचे उद्‌घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रिय सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर विकास विभागाचे मंत्री जी किशन रेड्डी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालय (केंद्रीय संचार  विभाग), संरक्षण, आयुष (AYUSH), वस्त्रोद्योग (हस्तकलाकृती विकास आयुक्त इत्यादी) इतर केंद्रीय मंत्रालये देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या पर्यटन पर्वमध्ये पश्चिम आणि मध्य भारतातील 5 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील कारागिरांच्या हस्तकलाकृतींचे 15 स्टॉल असलेला क्राफ्ट बझार, आयुर्वेद @2047 या संकल्पनेवर आधारित आयुष मंत्रालयाचा स्टॉल, अग्निपथ योजनेचा प्रचार करण्यासाठी भारतीय वायुदलाच्या मुंबईमधील भर्ती कार्यालयाचा स्टॉल असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय आणि आसपासच्या परिसरातील आकर्षणे याबाबत माहिती सांगण्यासाठी स्थानिक पर्यटक मार्गदर्शकांबरोबर मोफत टूर असणार आहे.
——————————————————————————————————