- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, २४ सप्टेंबर २०२२
‘विकास काम करताना स्थानिकांना भकास करून चालणार नाही. त्यामुळे वरळी- शिवडी उन्नत मार्ग प्रकल्प बाधितांच्या सर्व अडचणी समजून घेऊन, त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यावर उपाययोजना केल्या जातील, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
वरळी- शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पामध्ये बाधीत होणाऱ्या प्रभादेवी परिसरातील कामगार नगर १ व २ आणि गणेशनगर या भागाची शिंदे यांनी पाहणी केली.
यावेळी खासदार राहुल शेवाळे आमदार सदा सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त एस.व्ही. आर.श्रीनिवासन यांच्यासह मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी तसेच प्रकल्प अभियंता, अधिकारी आदी उपस्थित होते.
वरळी- शिवडी उन्नत मार्ग प्रकल्प बाधीतांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आज जाणीवपूर्वक हा पाहणी दौरा केला. गेली काही वर्षे या रहिवाशांच्या संक्रमण शिबिर, घरांचे भाडे, पुनर्वसन आणि पुनर्विकास यांच्याशी निगडित अडचणी प्रलंबित आहेत. त्याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन संबंधित सर्व विभागांच्या समन्वयाने उपाययोजना केल्या जातील. झोपडपट्टी पुनर्वसन आणि प्रकल्प, योजना रेंगाळू नयेत यासाठी प्रयत्नशील आहोत. यात केंद्र आणि राज्य मिळून पुनर्विकासाबात एकत्रित आणि समन्वयाने प्रयत्न करु.स्थानिक नागरिकांच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व पाठबळ उभे करू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.