हे गद्दारांचे सरकार कोसळणार

आमदार आदित्य ठाकरे यांचा दावा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • रायगड, 17  ऑगस्ट 2022:

हे गद्दारांचे सरकार आहे कोसळणार म्हणजे कोसळणार. या लोकांना दुय्यम खाती मिळाली, आता पश्चाताप तोंडावर दिसतोय. यांना गरजेपेक्षा आणि लायकी पेक्षा जास्त दिलं. यांना डोळेबंद करून मिठी मारली तर यांनी पाठित खंजीर खुपसला. सरकारमधून बाहेर पडल्याचं नाही तर या बंडखोरांना सर्वोतपरी मदत केली, तिकिटं दिली. यांच्यासाठी सभा घेतल्या यांनीच गद्दारी केली,  अशी खंत आदित्य ठाकरे यांनी आज रायगड इथे व्यक्त केली.

शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्पा आज रायगड येथे पार पडला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप कार्यालयाच्या समोर शिवसैनिकांशी संवाद साधला.

आम्ही गद्दारांचे विधानभवनात चेहरे बघत होतो. चेहरे लपवून चालत होते. गेम झाल्याचे चेहऱ्यावर दिसत होतं, असही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.  तुमच्यावर दडपण असेल कोणी काही बोलणार नाही. जर तुम्हाला तेथे आनंदात रहायचं असेल लाज उरली असेल तर राजीनामे द्या निवडणुकीला सामोरे जा होऊन जाऊदे; जनता कुणाला कौल देईल तो मला मान्य आहे. अजून ही काहींना वाटत असेल आपण चुकलो त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, असा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी केला.

उठाव करायला ताकद लागते, यांनी पळून जाऊन गद्दारी केली. हे खरे शिवसैनक असते तर डोंगर हॉटेल बघत नसते त्याचवेळी आसामच्या पुरात मदतीला उतरले असते. खायला तिकडे अन्न नव्हते, मदत हवी होती. शिवसैनिक असते तर मदत करायला उतरले असते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

सरकार पडत असताना हे टेबलावर नाचणारे तुमचे आमदार होतील, हे नेतृत्व तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केला. घसा फोडून सांगत आहेत बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेत आहोत. जरा तरी शिवसैनिक असते तर बाळासाहेबांचा मुलगा राजीनामा देत असताना तुम्ही पेढे भरवत नसता, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मराठी हिंदुमध्ये फूट पाडतील

महाराष्ट्राचे पाच तुकडे करतील. दंगली करतील, यांना महाराष्ट्र मागे खेचायचा आहे. मला तुमच्याकडून काही नको फक्त प्रेम आणि आशिर्वाद हवेत. ही गद्दारी शिवसेनेसोबत नाही महाराष्ट्रासोबत आणि माणुसकीसोबत केली. ही गद्दारी तरुणांना संदेश आहे की चांगल्या लोकांना या राजकारणात संधी नाही हे दाखवण्यासाठी आहे. शिवसेनेला फोडा मराठी हिंदुमध्ये फूट पाडा ठाकरेंना एकटे पाडा हिच यांची इच्छा आहे, जे तुम्ही होऊ देणार नाही याची खात्री आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

——————————————————————————————————————-