- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 11 ऑगस्ट 2022
मुंबई- गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची श्वास रोखून धरणारी दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची विलोभनीय दृश्ये असोत. निसर्गाची उधळण डोळ्यात साठवत केलेला प्रवास हा नेहमीच अविस्मरणीय ठरतो. हीच बाब लक्षात घेवून मध्य रेल्वेतर्फे मुंबई- गोवा तसेच मुंबई- पुणे या रेल्वे मार्गांवर प्रवासात बसल्याजागी निसर्गाचे विहंगम दृश्य बघण्याची संधी उपलब्ध करून देणारे व्हिस्टाडोम डबे रेल्वे गाड्यांना जोडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या विस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आता मध्य रेल्वेचा पाचवा विस्टाडोम डबा पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसलाही जोडण्यात आला आहे.
अनोखे विस्टाडोम डबे, काचेचे छत असण्याव्यतिरिक्त, रुंद खिडकीचे पॅनल, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, रुंद स्लाइडिंग दरवाजे इ. अशी अनेक असामान्य वैशिष्ट्ये यात आहेत. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण व्ह्यूइंग गॅलरी सुद्धा यामध्ये आहे.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचमध्ये एप्रिल ते जुलै 2022 या कालावधीत 31821 प्रवाशांची नोंद असून 3 कोटी 99 लाख कोटी रुपये महसूलाची नोंद केली आहे.
2018 मध्ये मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम डबे पहिल्यांदा सादर करण्यात आले होते. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे 26 जून 2021 पासून मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेसला जोडण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मध्य रेल्वेचा तिसरा विस्टाडोम कोच 15 ऑगस्ट 2021 पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला आणि 25 जुलै 2022 रोजी चौथा विस्टाडोम कोच प्रगती एक्स्प्रेसला जोडण्यात आला. आता पुणे – सिकंदराबाद शताब्दीला विस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. आजपासून म्हणजेच 10 ऑगस्ट 2022 पासून विस्टाडोम कोच जोडण्यात आलेली पुणे – सिकंदराबाद शताब्दी मध्य रेल्वेवरील 5 वी एक्सप्रेस असेल.
पुणे- सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसचे प्रवासी उजनी बॅकवॉटर आणि भिगवणजवळील धरणाचा आनंद घेतील, जे अनेक अंतर्देशीय आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे, तसेच विकाराबादजवळील अनंतगिरी टेकड्यांमधून जाताना जंगलातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतील. 12025 पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी 6 वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2.20 वाजता सिकंदराबादला पोहोचेल. 12026 सिकंदराबाद – पुणे शताब्दी एक्सप्रेस सिकंदराबाद येथून दुपारी 2.45 वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि त्याच दिवशी (मंगळवार वगळता) रात्री 11.10 वाजता पुण्याला पोहोचेल.