राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची शिफारस
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- 9 जुलै 2022:
भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांच्याशी संबंधित दोन स्थळांना राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके म्हणून घोषित करण्याची शिफारस राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली आहे. या शिफारशी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासमोर सादर केल्या आहेत.
दोन ठिकाणे कोणती
23 सप्टेंबर 1917 रोजी डॉ. आंबेडकरांनी जिथे अस्पृश्यता निर्मूलनाचा संकल्प केला होता ते वडोदरा येथील संकल्प भूमी वटवृक्ष परिसर स्थळ. हे ठिकाण शंभर वर्षांहून अधिक जुने आणि डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेल्या सामाजिक सन्मानाच्या क्रांतीचे साक्षीदार आहे.
भीमराव रामजी आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण घेतले त्या महाराष्ट्रातील साताऱ्यामधील प्रताप राव भोसले हायस्कूलला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्याची शिफारसही राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली आहे.
या शाळेच्या नोंदवहीत अजूनही एक विद्यार्थी म्हणून भीमराव यांच्या मराठीतून केलेल्या स्वाक्षऱ्या आहेत . सध्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या शाळेची दूरवस्था झाली आहे.
——————————————————————————————————