एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत भाजपाचे ‘वेट अँड वॉच’चे धोरण

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेल्या भूमिकेमागे भारतीय जनता पार्टीचे कोणतेही नियोजन नाही. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या स्थैर्याबाबत भाजपाचे सध्या ‘वेट अँड वॉच’ अर्थात थांबा आणि वाट पाहा असे धोरण आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले.

ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष  माधव भांडारी,  सुनील कर्जतकर, राज पुरोहित, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, उत्तर भारतीय मोर्चाचे संयोजक संजय पांडे व प्रवक्ते अतुल शाह उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत आताच मत व्यक्त करणे घाईचे ठरेल. ते शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते आहेत. त्यांची भूमिका व त्यातून निर्माण झालेली परिस्थिती ही त्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे. भाजपाने  शिंदे यांना सत्तास्थापनेचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा त्यांच्याकडूनही कोणताही प्रस्ताव आलेला नाही.

ते म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली व महाविकास आघाडीमार्फत सत्ता मिळवली. पण ही अनैसर्गिक युती असल्याने त्यामध्ये शिवसेनेच्या खासदार व आमदारांची घुसमट होत आहे. आगामी निवडणूक आपण भाजपासोबत युतीशिवाय जिंकू शकत नाही, असे अनेकांना वाटते. त्यातून पक्षाच्या नेत्यांची खदखद बाहेर पडणे स्वाभाविक आहे.

=====================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप