नवी मुंबईत 5 वर्षाखालील 64,999 मुलांनी घेतला पोलिओचा डोस

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 20 जून 2022

उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी महानगरपालिका क्षेत्रात प्रभावी रितीने राबविण्यात आली. 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, महत्वाचे नाके अशा विविध ठिकाणी 600 स्थायी, 94 ट्रान्झिट व 28 फिरते मोबाईल असे एकूण ‌722 पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. यामध्ये 64999 बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. म्हणजेच 73% अपेक्षित लाभार्थी मुलांचे लसीकरण झालेले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ – या घोषवाक्यास अनुसरून 5,34,661 घरांपर्यंत नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून पोलिओ लसीकरण मोहीमेची माहिती पोहचविण्यात आली. 874 पथकांव्दारे जनजागृती करण्यात आली. या शिवाय महानगरपालिका क्षेत्रात 723 बॅनर्स आणि 2936 पोस्टर्समधून व्यापक प्रमाणात माहिती प्रसारित करण्यात आली. साधारणत: 89445 इतके 5 वर्षाखालील लाभार्थी नजरेसमोर ठेवून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.

तथापि काही कारणांमुळे ज्या संभाव्य लाभार्थी बालकांचे लसीकरण होऊ शकले नाही त्यांना दि. 20 जून ते 24 जून 2022 या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

=====================================================