माजी खासदार डॉ संजीव नाईक यांच्यासह विविध प्रकल्पग्रस्त नेत्यांचा इशारा
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 20 जून 2022
नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव द्यावेच लागेल असे ठणकावून सांगत येत्या २४ जून रोजी लोकनेते दि बा पाटील साहेब यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त पुनःश्च एकदा नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरणासह शासन आणि प्राधिकरणातील ज्वलंत तसेच प्रलंबित हक्कांच्या मागण्यांसाठी भूमीपुत्र, शहरवासीय आणि झोपडपट्टीवासीय एकत्रितरीत्या राज्य शासनाच्या विरोधात शांततेच्या मार्गाने सिडकोस घेराव आंदोलन छेडणार असल्याची घोषणा माजी खासदार संजीव नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समिती आयोजित २९ गाव संवाद बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखेरणे येथील शेतकरी समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
दि बा पाटील नामकरण आंदोलन हे महाविकास आघाडीने ओढवून घेतलेला प्रश्न आहे. दि. बां. च्या निधनानंतर आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत नामकरण ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला होता, मग दि बा पाटील यांच्या नामकरण प्रस्तावावर निर्णय घेण्यास मुख्यमंत्री विलंब का लावत आहे ? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.
डॉ राजेश पाटील यांनी सांगितले की, नवी मुंबईतील स्थानिक कष्टकरी, शेतकरी यांच्या अस्मितेसाठी शासनाने दिबांची कर्मभूमी असलेल्या भूमीवर साकारत असलेल्या विमानतळाला दिबांचे नाव द्यावे अशी आग्रही मागणी स्थानिक भूमिपुत्र व आता शहरातील नागरिक देखील सातत्याने करीत आहेत. या नामकरण सह भूमिपुत्रांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत मुंबई , ठाणे, रायगड ,पालघर आदी चार जिल्ह्यातील भूमिपुत्र एकसंघ होऊन आपली शक्ती शासनास दाखवणार आहेत . आपल्या भावी पिढीच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकसंघ होऊन २४ जूनच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन डॉ पाटील यांनी बोलताना केले .
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दशरथ भगत यांनी सांगितले की , दि.बा पाटील यांच्या नावामागे देशातील भूमिपुत्रांच्या स्थनिक लोकाधिकाराचा स्वामित्व हा खरा बिंदू असून, याच हक्कासाठी सुरू झालेली ही चळवळ म्हणजे भविष्यातील देशातील भूमिपुत्रांच्या अस्तित्वाच्या लढाईचा केंद्रबिंदू म्हणजे ही नामकरण चळवळ असणार आहे. २४ जूनचे सिडको घेराव आंदोलन हे पुनश्च एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी सरकारला इशारा देणारे असणार आहे. दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण आंदोलन हे आम्ही गांधी मार्गाचा अवलंब करून शांततेत करू. मात्र आंदोलनाचे रूपांतर उद्रेकात करायचे का? हे शासनाने ठरवावे असेही भगत यांनी सांगितले .
या पत्रकार परिषदेला दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे डॉ संजीव नाईक, संतोष केणे, नवी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, डॉ राजेश पाटील, मनोहर पाटील, दिपक पाटील, नवी मुंबई क्षेत्र समन्वयक शैलेश घाग, सुनील पाटील, शिवचंद्र पाटील, सुरेश वास्कर, प्रकाश पाटील, साईनाथ पाटील, शशांक कट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
=================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप