नवी मुंबईतील हजारो झोपडीवासीय 27 एप्रिल रोजी मंत्रालयावर धडकणार

मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडीवासीयांचा सर्व्हे पूर्ण करा, झोपड्यांवरील कारवाई त्वरीत थांबवा – रवि भिलाणे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 21 एप्रिल 2022

मुंबई मेट्रोपोलिटन रिजन अर्थात मुंबई महानगर क्षेत्रातील लाखो झोपडीवासीयांना घराचा अधिकार मिळावा यासाठी घर हक्क संघर्ष समन्वय समितीच्या बॅनरखाली हजारो झोपडीवासीयांचा मोर्चा येत्या 27 एप्रिल रोजी मंत्रालयावर धडकणार आहे.घर हक्क संघर्ष समन्वय समितीच्या बॅनरखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी घरांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या अनेक संस्था,संघटना आणि पुरोगामी पक्ष एकवटले आहेत. नवी मुंबईतील हजारो झोपडीवासीय या मोर्चात सामील होणार असल्याची माहिती घर हक्क संघर्ष समानव्य समितीच्या वतीने जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिरामण पगार,खाजमिया पटेल आणि जनता दलाचे महासचिव रवि भिलाणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारने 2011 पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याची घोषणा करून एक तप उलटले तरी सरकार कडे कोणताही अद्ययावत सर्व्हे नाही. मात्र वाट्टेल तेव्हा मनमानी पद्धतीने तोडक कारवाई करून सरसकट सर्वच झोपडीधारकाना बेघर केलं जातं आहे. झोपडीवासीयांना वीज,पाणी,शौचालये आदी मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित ठेवलं जात आहे. सरकारने झोपडीवासियांसाठी घोषित केलेल्या कोणत्याही योजना पूर्ण केल्या जात नाहीत.मात्र सर्व नियम कायदे कानून बासनात गुंडाळून वाट्टेल तेव्हा त्यांना बेघर केलं जातं आणि पुनर्वसनही नीट केलं जातं नाही.झोपडी धारकांकडील पुरावे ग्राह्य धरले जात नाहीत अशी परिस्थिती आहे.त्यामुळे सरकारने आता एकदाचा काय तो सर्व्हे पूर्ण करावा आणि तीच अंतिम कट ऑफ डेट जाहीर करावी या आणि इतर अनेक मूलभूत मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याची माहिती घर हक्क संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक हिरामण पगार तसेच खाजामिया पटेल आदींनी दिली.

या मोर्चात मुंबई,नवी मुंबई,ठाणे परिसरातील हजारो झोपडीधारक सामील होणार असून मुंबई महानगर क्षेत्रातील विविध पुरोगामी पक्ष,संस्था – संघटना यांनीही यात सामील व्हावं असं आवाहन घर हक्क संघर्ष समन्वय समितीच्या वतीने  रवि भिलाणे, संजय शिंदे, नामदेव पोपट गुलदागड, हैदर इमाम यांनी केले आहे.

====================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप