जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेचा “स्त्री शक्तीचा जागर”

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 7 फेब्रुवारी  2022:

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उद्या 8 मार्च रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात “स्त्री शक्तीचा जागर” हा विविध कार्यक्रमांनी नटलेला अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सकाळी 9.30 वाजल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा सन्मान या विशेष समारंभात केला जाणार असून महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या ऑनलाईन स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभही संपन्न होणार आहे.

याप्रसंगी सुप्रसिध्द उद्योजिका मिनल मोहाडीकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार असून आंतरराष्ट्रीय धावपटू ललीता बाबर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व इतर अधिकारी देखील या कार्यक्रमाप्रसंगी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने जागतिक महिला दिनानिमित्त 3 मार्च ते 7 मार्च या कालावधीत विशेष संवादमालेचे आयोजन केले असून यामध्ये दररोज संध्या. 5 वा. योग आणि आहार, मानसिक आरोग्य, मूल दत्तक घेताना व सरोगसी, क्रीडा क्षेत्रात महिलांना संधी, महिला सबलीकरण की सक्षमीकरण अशा विविध विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ महिला व्याख्यात्यांनी ऑनलाईन व्याख्याने दिली आहेत. या ऑनलाईन उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला आहे.

पारितोषिक वितरण समारंभ

महिलांच्या अंगभूत गुणांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने आयोजित शहर स्वच्छतेत माझा सहभाग या विषयावर निबंध स्पर्धा, वैयक्तिक गायन स्पर्धा, वैयक्तिक लोकनृत्य स्पर्धा, आजची प्रगतशील भारतीय स्त्री या विषयावरील रांगोळी स्पर्धा, सलाड सजावट स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे स्पर्धा, 21व्या शतकातील स्त्री समोरील आव्हाने या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आणि आमची बाग स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभही संपन्न होणार आहे.

नवी मुंबईकर महिलांचा गौरव

याप्रसंगी स्त्री शक्तीचा जागर हा गीतनृत्यांनी नटलेला विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार असून यामध्ये स्पर्धेतील विजेत्यांचे सादरीकरणही केले जाणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करून स्वत: प्रमाणेच नवी मुंबई शहराचाही नावलौकीक उंचाविणा-या कर्तबगार नवी मुंबईकर महिलांचा गौरव केला जाणार आहे. तसेच महानगरपालिका राबवित असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन त्यामधून उद्योग, व्यवसाय उभारत यशस्वी झालेल्या महिलांचा तसेच महिला बचत गटांचाही सन्मान केला जाणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनी स्त्री शक्तीला अभिवादन करण्यात येणार आहे.

——————————————————————————————————