836 व्यक्तींच्या सहभागाने साकारले पथनाट्य
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 25 फेब्रुवारी 2022:
‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ला सामोरे जाताना नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांच्या सहभागावर भर देत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. या अनुषंगाने स्वच्छतेचे पुरस्कर्ते थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीदिनी 23 फेब्रुवारी रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 111 प्रभागांमध्ये सायं. 6 वाजता एकाच वेळी, एकाच स्वच्छता विषयावरचे, एकसारख्या पथनाट्यांचे आयोजन ‘करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमाची विशेष नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या विविध क्षेत्रातील विक्रम नोंदविणा-या संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेस जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
-
या जागतिक विक्रमाबद्दल ‘एकाच वेळी 111 निवडणूक वॉर्डात 111 वेगवेगळ्या नाट्य समुहांच्या माध्यमातून एकूण 836 व्यक्तींच्या सहभागाने पथनाट्याव्दारे साकारलेल्या व्यापक जनजागृती मोहिमेव्दारे जगातील अशाप्रकारचा सर्वात मोठा कार्यक्रम’ असा मजकूर असलेले विश्वविक्रमी नोंदीचे प्रमाणपत्र व सन्मान पदक महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स संस्थेचे परीक्षक बी. बी. नायक यांनी प्रदान केले.
याप्रसंगी प्रशासन विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तथा स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे मनपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेला लाभलेला हा विश्वविक्रमी बहुमान नवी मुंबईकर नागरिकांच्या स्वच्छता कार्यातील जागरुकतेचे प्रतिक असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या विश्वविक्रमाबद्दल समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
महानगरपालिकेच्या आजवरच्या वाटचालीत नेहमीच जनतेपर्यंत पोहोचणे व स्वच्छताविषयक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित लोकांचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेणे यावर भर देण्यात आला आहे. त्यास अनुसरून यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये नागरिक सहभागाला सर्वाधिक प्राधान्य (Peoples First) देत ‘माझं शहर – माझा सहभाग’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे असे सांगत महापालिका आयुक्त बांगर यांनी पथनाट्यासारख्या लोकप्रिय जनजागृतीपर माध्यमाचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने एकाच वेळी पथनाट्ये सादर करण्याची संकल्पना पुढे आली अशी माहिती दिली.
- दरवर्षी वॉर्डावॉर्डात वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्ये सादर होत असतात. त्याचा प्रभावही त्या कार्यक्षेत्रापुरता मर्यादित राहतो. मात्र अधिक मोठ्या प्रमाणात एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्ये सादर झाली तर त्याचा प्रभाव विस्तारेल व यामधून अधिकाधिक लोकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश घेऊन जाणे शक्य होईल हा विचार पुढे आला.
इतक्या मोठ्या प्रमाणात कलावंत उपलब्ध होणे हे काहीसे कठीण काम होते. मात्र आरंभ क्रिएशन्स या कला संस्थेने हे आव्हान स्विकारले व ते यशस्वीरित्या पूर्ण केले याबद्दल आयुक्तांनी सर्व सहभागी कलावंतांचे व संस्थेचे कौतुक केले. या सर्व 111 ठिकाणच्या पथनाट्य सादरीकरणाचे वेबप्रणालीव्दारे एकत्रितपणे महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व स्वच्छ महाराष्ट्र अभियान नोडल अधिकारी तथा उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी निरीक्षण केले.
या जनजागृतीपर पथनाट्य उपक्रमाला जागतिक विक्रमाचे कोंदण लाभले ही आनंदाची व अभिमानाची बाब असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या विश्वविक्रमामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे मत व्यक्त केले आहे व समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे विश्वविक्रमी अभिनंदन केले आहे.
—————————————————————————————————————