राज्यभरात शिवजयंतीचा आनंदोत्सव

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 19 फेब्रुवारी  2022:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  या निमित्ताने रायगड, सिंधुदुर्ग किल्यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे. शिवराय सर्वांचे होते. शिवरायांच्या युद्ध नितीमुळे भारतीय लष्कर त्यांना आज आपले दैवत मानते असही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे, त्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता हा वारसा जतन करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव  उत्साहात साजरा झाला, त्यावेळी पवार बोलत होते. कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार  छत्रपती संभाजीराजे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी यासाठी गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाची भूमिका असून यासाठी पुरातत्व, पर्यावरण, वन विभाग आदी विभागांच्या माध्यमातून जुन्या बांधकाम रचनेला धक्का न लावता या वारसास्थळांचे जतन करण्यात येईल. राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवनेरी किल्ले संवर्धनासाठी २३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यातून किल्ल्याच्या परिसरात विकास कामे सुरू आहेत. किल्ले रायगड  संवर्धनासाठीही मोठ्या प्रमाणात निधी दिला असून अनेक विकासकामे तेथे सुरू आहेत.

शिवाजी महाराजांनी जुन्नर येथील हापूस आंबा जपला. या आंब्याचे जतन करण्याचे काम सुमारे साडेतीनशे वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी केले. त्याला भौगोलिक मानांकन (जी.आय.) मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिलेल्या २७ लाख रुपयांच्या निधीतून प्रयत्न केले जातील.

शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जुन्नर येथील महिला पथकाने ढोल व लेझीमचे पारंपरिक सादरीकरण केले.

  • ‘जुन्नर रत्न’ या पोस्टकार्ड संचाचे प्रकाशन
  • भारतीय डाक विभागाने केलेल्या ‘जुन्नर रत्न’ या पोस्टकार्ड संचाचे प्रकाशनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. १५ सचित्र पोस्ट कार्डाच्या या संचात येथील किल्ले, जैवविविधता, पर्यटन स्थळे, मंदिरे आदींचा समावेश आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांची संकल्पना यामागे होती.

नवी मुंबईत शिवजयंतीचा उत्साह

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालयातील अँम्फिथिएटर येथेही शिवप्रतिमा पूजन करण्यात आले व राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशव्दाराजवळील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या अर्धपुतळ्यासही पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता संजय देसाई, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे व अनंत जाधव, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, मनोहर सोनावणे व सुनिल लाड आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  

——————————————————————————————————