- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 15 फेब्रुवारी 2022:
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 साठीच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकती, सूचनांवर गुरूवार 17 फेब्रुवारी 2022 रोजी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी घेण्यासाठी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मुंबई यांना राज्य निवडणूक आयोगाकडून प्राधिकृत करण्यात आलेले आहे. विभागीय आयुक्त, कोकण विभाग व जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा यांच्या उपस्थितीत सकाळी 9.00 वाजल्यापासून ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे सुनावणी घेण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 ची प्रारूप प्रभाग रचना 01 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मा. राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केल्याप्रमाणे 01 ते 14 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. या कालावधीत नागरिकांकडून 3 हजार 852 हरकती दाखल झाल्या आहेत. नवीन प्रारूप प्रभाग रचनेनुसार 41 प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत.
विभाग कार्यालयामार्फत सदर सुनावणीकरिता हजर राहण्यासाठी संबंधितांना सूचनापत्र देण्यात येत आहे. हरकत/सूचनाधारकांनी सूचनापत्रात नमूद केलेल्या वेळेच्या 15 मिनिटे आधी आपले प्राप्त झालेले सूचनापत्र व हरकती/सूचनांसह सुनावणीकरिता उपस्थित रहावयाचे आहे. फक्त हरकती/सूचनाधारकास सुनावणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. जे हरकती/सूचनाधारक त्यांना दिलेल्या निश्चित वेळेस उपस्थित राहणार नाहीत किंवा गैरहजर राहतील त्यांची हरकत/सूचना एकतर्फी निकाली काढण्यात येईल असे महापालिकेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
——————————————————————————————————