राजकीय हत्येच्या बनाव रचून प्रभाग रचनेत हेराफेरी ?

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांचा गंभीर आरोप

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 11 फेब्रुवारी 2022

ठाणे महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करताना माझी राजकीय हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड यांनी नुकताच केला आहे. तसेच, पालिकेने निवडणूक आयोगाला सादर केलेला मूळ आराखडा जाहीर करण्याची मागणीही आव्हाड यांनी केली आहे. मग हा मूळ गोपनीय आराखडा आव्हाड यांनी पाहिला आणि तो बदलण्यास भाग पाडले, असा अर्थ घ्यायचा का, असा गंभीर आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे.

पालिकेने निवडणूक आयोगाला सादर केलेला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा हा गोपनीय असताना तो आव्हाड यांच्या हाती लागलाच कसा, असा प्रश्न उपस्थित करत, आव्हाड यांनी निवडणूक आयोगाला सदोष माहितीच्या आधारे निवेदन देत त्यांच्यावर दबाव टाकून आराखडा बदलण्यास भाग पाडल्याचा संशयही महापौरांनी व्यक्त केला आहे.

आपली राजकीय हत्या होईल, असा बनाव रचून प्रभाग रचनेत हेराफेरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, त्याच्या सखोल चौकशीची मागणी म्हस्के यांनी केली आहे.

आयोगाच्या आराखड्यात कायद्याची पायमल्ली करण्यात आली असून मुंब्र्यातील प्रभाग वाढविण्याच्या नादात दिवा परिसरातील लोकप्रतिनिधींच्या संख्येला कात्री लावण्यात आली आहे. अंतिम प्रभाग रचनेत दिवा भागाला योग्य प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर या आराखड्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप