मास्कचा वापर न करणारा आणि लसीकरणही पूर्ण न झालेला कर्मचारी
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 9 डिसेंबर 2021:
ओमायक्रॉन व्हॅरियंटचे रुग्ण आढळून आल्यानंतर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ‘मास्क व लसीकरण नाही तर प्रवेश नाही’ अशा प्रकारची मोहिम राबवायला सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेत महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकाला ग्रॅड सेंट्रल मॉल सीवूड नेरुळ याठिकाणी मास्कचा वापर न करणारा आणि लसीकरणही पूर्ण न झालेला कर्मचारी आढळून आला. याची दखल घेत महापालिकेने ग्रॅड सेंट्रल मॉल व्यवस्थापनाला 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.
ओमायक्रॉन या व्हॅरियंटचे रुग्ण मुंबई व महाराष्ट्रातील इतर शहरात आढळलेले असून या पार्श्वभूमीवर कोरोनापासून बचावासाठी मास्क हीच महत्वाची संरक्षक ढाल आहे यादृष्टीने मास्कचा नागरिकांनी अनिवार्यपणे वापर करावा याकरिता जागरुकता निर्माण केली जात आहे. ‘मास्क व लसीकरण नाही तर प्रवेश नाही’ अशा प्रकारची मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेची विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथके व मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथके अधिक सक्षमतेने कार्यरत करण्यात आलेली आहेत.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकाला ग्रॅड सेंट्रल मॉल सीवूड नेरुळ याठिकाणी मास्क परिधान न केलेला मॉल कर्मचारी आढळला. त्याची अधिक चौकशी केली असता त्याचे दोन्ही डोस पूर्ण झाले नाहीत असे निदर्शनास आले. साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये आस्थापनांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांचे संपूर्ण कोविड लसीकरण म्हणजेच कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणे गरजेचे असून सदर नियमांचा भंग केल्याप्रकरणी ग्रॅड सेंट्रल मॉल सीवूड नेरुळ व्यवस्थापनाकडून 50 हजार रक्कमेचा दंड वसूल कऱण्यात आलेला आहे.