इटीसी केंद्रामार्फत महिनाभर दिव्यांगत्वाबाबत जनजागृती उपक्रम

विशेष संकेतस्थळाचा शुभारंभ

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 7 डिसेंबर 2021:

समाजामध्ये दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करणे तसेच दिव्यांग मुलांना प्रोत्साहित करणे या हेतूने नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राच्या वतीने संपूर्ण  डिसेंबर महिन्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

एकाच छताखाली विविध प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राच्या वतीने दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनी नमुंमपा इटीसी केंद्रामध्ये etcnmmc.org  या इटीसी केंद्राच्या विशेष संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. या संकेत स्थळामुळे दिव्यांगांकरिता असलेल्या योजनांचे अर्ज दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या दाखल करता येणार आहेत. इटीसी केंद्राव्दारे राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती देणा-या माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले,  प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील तसेच इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

दिव्यांगत्व कायदा 2016 नुसार नव्याने ज्या 21 दिव्यांग प्रवर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याची माहिती सर्व नागरिकांना व्हावी यादृष्टीने या सर्व दिव्यांग प्रवर्गाचे प्रतिकात्मक साहित्य निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचेही अनावरण या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले. तसेच नमुंमपा इटीसी केंद्रातील दिव्यांग मुलांच्या अंगभूत गुणांना वाव देण्याकरिता या मुलांच्या चित्र प्रदर्शनाचेही अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी इटीसी केंद्राच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करीत केंद्रामार्फत दिव्यांग मुलांच्या समवेत त्यांच्या पालकांसाठीही नवनवीन उपक्रम राबवावेत अशी सूचना केली. तसेच अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिव्यांग मुलांमधील अक्षमतांपेक्षा त्यांच्या कौशल्यावर भर देत त्यांचा विकास करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी इटीसी केंद्रातील मुलांनी काढलेल्या चित्रप्रदर्शनाचेही कौतुक केले.

——————————————————————————————————