सध्या कुठलेही निर्बंध लावले जाणार नाहीत- आरोग्य मंत्री राजेश टोपे
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 6 डिसेंबर 2021:
सध्या राज्यात ओमायक्रॉनचे आठ रुग्ण असून त्यांच्या सहवासातल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. विमानतळावर स्क्रिनिंग सुरू असून पॉझिटिव्ह असलेल्यांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले जात आहेत. राज्यात सध्या जिनोमिक सिक्वेसिंगच्या तीन लॅब असून आणखी दोन लॅब वाढवणार आहे. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन औरंगाबाद आणि नागपूर येथे आणखी दोन लॅब सुरु करणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालना इथे सांगितले. तसेच राज्यात सध्या कुठलेही निर्बंध लावले जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एनटीएजीआयची आज दिल्लीत बैठक होत असून या बैठकीत लहान मुलांचं लसीकरण, बूस्टर डोस देण्याबाबत केंद्राने निर्णय घेतल्यास हा निर्णय स्वागतार्ह राहील, असंही टोपे यावेळी म्हणाले. सध्या राज्यात ओमायक्रॉनचे आठ रुग्ण असून त्यांच्या सहवासातल्या नागरिकांचा शोध सुरू आहे.
राज्याच्या टास्क फोर्सची अंतर्गत मिटिंग आज होणार असून या बैठकीत राज्यातल्या ओमिओक्रॉन संसर्गाबाबत आढावा घेतला जाणार आहे. लहान मुलांना लसीकरण करण्यासाठी केंद्राची परवानगी मिळण्यासाठी आग्रह या बैठकीत धरला जाणार असून बूस्टर डोससाठी केंद्राकडे आग्रह धरण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रीय विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार सोमवारी संध्याकाळी मुंबईत आणखी 2 ओमायक्रॉनचे रूग्ण आढळून आले असून राज्यातील ओमायक्रॉनचे रूग्णांची संख्या 10 झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून 25 नोव्हेंबरला मुंबईत आलेल्या 37 वर्षिय तरूणाला आणि त्याच्या सोबत राहिलेल्या अमेरिकेहून 25 नोव्हेंबरलाच मुंबईत आलेल्या 36 वर्षिय तरूणीलाही ओमायक्रॉनची लागण झाल्याचे या अहवालात आढळून आले आहे. या दोघांनीही फायझरच लस घेतली असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांच्यावर सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या शिवाय राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 34 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
——————————————————————————————————