ऐरोली येथील आंबेडकर स्मारकातील सुविधांचे उद्या लोकार्पण

ई लायब्ररी, अत्याधुनिक ऑडिओ सुविधा, होलोग्राफिक कक्ष नागरिकांसाठी खुला होणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 4 डिसेंबर 2021:

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15, ऐरोली येथे उभारण्यात आले आहे. स्मारकातील  वैशिष्टयपूर्ण सुविधांचा लोकार्पण समारंभ उद्या संध्याकाळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्र राज्याचे नगरविकास  व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सध्याच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनामार्फत कोव्हीड प्रतिबंधात्मक नवीन नियमावलीच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळी उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा असल्याने हा कार्यक्रम  नवी मुंबई महानगरपालिका फेसबुक पेज आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे यू ट्युब पेज यावरून थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.

नवी मुंबई शहरातीलच नव्हे देशातील एक उत्कृष्ट स्मारक म्हणून नावाजले जाईल अशी या स्मारकाची रचना करण्यात आलेली आहे. या स्मारकाला भेट देणा-या व्यक्तीला बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातील महानता आणि विचारांची सर्वसमावेशक भव्यता प्रत्ययास येईल अशा सुविधांसह स्मारक उभारण्यात आलेले आहे.

स्मारकातील विविध सुविधा

स्मारक वास्तू दोन भागात असून बहुउद्देशीय भागात वातानुकूलीत अद्ययावत सभागृह व इतर सुविधा कक्ष तसेच मागील डोम असलेल्या भागात तळमजल्यावर ई लायब्ररी सुविधेसह समृध्द ग्रंथालय, अत्याधुनिक ऑडिओ सुविधेसह जीवन प्रवास दर्शविणारे माहितीपूर्ण छायाचित्र दालन, आभासी चलचित्र विशेष कक्ष (Holographic Presentation) आणि पहिल्या मजल्यावर ध्यान केंद्र ( Meditation Center ) अशा विविध सुविधा आहेत.

 

नवी मुंबई या आधुनिक शहराच्या नावलौकीकात लक्षणीय भर टाकणारी ही भव्यतम स्मारक वास्तू असून यामधील ग्रंथालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले व त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वावर व विचारांवर आधारीत देशी परदेशी मान्यवर लेखकांनी लिहिलेली ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या युवा पिढीची तंत्रस्नेही आवड लक्षात घेऊन त्याठिकाणी अद्ययावत ई-लायब्ररीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास दर्शविणारे अत्यंत माहितीपूर्ण छायाचित्र दालन स्मारकाचे विशेष आकर्षण आहे. यासोबतच आभासी चलचित्र विशेष कक्षामधून (Holographic Presentation) बाबासाहेबांचे भाषण प्रत्यक्ष बघण्याचा सुवर्ण योग उपलब्ध होणार आहे.

अशा विविध अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सर्वच दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण असून या स्मारकामुळे नवी मुंबईचा नावलौकीक देशभरात वाढणार आहे.
——————————————————————————————————