नवी मुंबईत कोरोना बाधीतांच्या संख्येसोबतच मृत्यू दरातही घट

मागील दीड महिन्यात शून्य मृत्यूचे 29 दिवस, मृत्यूदर 1.89 टक्के

  • अविरत वाटचाल न्यूज
  • नवी मुंबई, 23 नोव्हेंबर 2021:

नवी मुंबईत ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोरोना बाधीतांच्या संख्येत तसेच मृत्यू दरातही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. दिवाळीच्या कालावधीतही दैनंदिन रुग्णसंख्या 20 ते 30 दरम्यान असल्याचं आढळून येत आहे.  ऑक्टोबर महिन्याच्या 31 दिवसात 17 दिवस शून्य मृत्यूचे तसेच नोव्हेंबर महिन्याच्या 22 दिवसात 12 दिवस शून्य मृत्यूचे आहेत. अशाप्रकारे मागील दीड महिन्यात 29 दिवस शून्य मृत्यूचे आहेत. मागील 18,19,20,21 या नोव्हेंबर महिन्याच्या सलग 4 दिवसात एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे कोविड मृत्यूदर 1.89 टक्के इतका कमी झालेला आहे.

मार्च 2020 पासून आत्तापर्यंत 1 लाख 9 हजार 163 इतक्या व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्या असून त्यामधील 1 लाख 6 हजार 895 नागरिकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलेली आहे. अशाप्रकारे कोरोनामधून बरे होणा-यांचे प्रमाण 97.92 टक्के इतके आहे. सध्या उपचार सुरू असलेली कोरोना रूग्णसंख्याही 301 इतकी मर्यादीत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण दुपटीचा कालावधी 3504 दिवस म्हणजेच साधारणत: 9.5 वर्षे इतका आहे.

रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोध

सद्यस्थितीत कोरोना रुग्ण आढळतो अशा इमारतीत, सोसायटी व वसाहतीत टारगेटेड टेस्टींगवर भर देण्यात येत आहे. दररोज सरासरी 7 हजारहून अधिक नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 22 लक्ष 23 हजार 569 इतक्या कोव्हीड टेस्ट करण्यात आलेल्या असून त्यामध्ये शासन निर्देशानुसार आरटी-पीसीआर टेस्ट 60 टक्के आणि ॲन्टिजन टेस्ट 40टक्के असे टेस्टचे प्रमाण कायम राखले आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे प्रमाणही 30 हून अधिक आहे. अशाप्रकारे रुग्णसाखळी खंडीत करण्यासाठी ट्रेसींग, टेस्टींग व ट्रिटमेंट अशा त्रिसूत्रीमुळे  कोरोना बाधीतांची संख्या नियंत्रित होत असल्याचे दिसून येत आहे.

लसीकरणावर भर

कोविडची संभाव्य तिसरी लाट लांबविण्यासाठी टेस्टींगच्या प्रमाणात वाढ करण्यासोबतच जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणावरही भर दिला आहे.  शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार 18 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण करणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महानगरपालिका असून यापैकी 7 लाख 17 हजार 824 म्हणजेच 64.84 टक्के नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

लसीकरणासाठीही सर्व रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे, 2 मॉल मध्ये ड्राईव्ह इन लसीकरण तसेच इएसआय हॉस्पिटल वाशी येथील जम्बो लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. याशिवाय *”हर घर दस्तक अभियान” अंतर्गत नागरिकांच्या घराजवळ जाऊन लसीकरण करण्यात येत असून 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात आत्तापर्यंत 206 सत्रांमध्ये 13 हजार 551 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय वाशी, नेरुळ व घणसोली या रेल्वे स्थानकांवर लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली असून आत्तापर्यंत 23 सत्रांमध्ये 2150 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

—————————————————————————————————–