उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सिडको प्रशासनाला निर्देश
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 16 सप्टेंबर 2021
राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे यापुढील काळात इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्यांच्या चार्जिंगची सोयही सिडकोच्या नवीन वसाहतींची निर्मिती करताना प्रकल्पामध्ये नियोजन करण्यात यावे. यासाठी सध्या सुरु असलेल्या प्रकल्प आराखड्यामध्ये काही सुधारणा करता येतील का ते पहावे असे निर्देश उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांनी आज नवी मुंबईत दिले.
सीबीडी बेलापूर इथल्या सिडकोच्या मुख्यालयात आज उपमुख्यमंत्री पवार यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
सिडकोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो प्रकल्प, सुमारे 1 लाख 4 हजार घरांचा गृहनिर्माण प्रकल्प, खारघर येथील आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्क आणि नैना प्रकल्प आदी प्रकल्पांच्या सद्यःस्थितीचा उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी आढावा घेतला.
Other Video On YouTube
सिडकोच्या नवीन वसाहतींची निर्मिती करताना पुढील 25 वर्षांचा विचार करून नियोजन करावे. सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे देतानाच त्यांची देखभाल सुद्धा त्यांना परवडली पाहिजे, याचा विचार करावा, असही उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले. सिडको परिसराचा विकास करत असताना काँक्रिटचे जंगल उभारून चालणार नाही. घरांची निर्मिती करत असताना त्या भागातील मोकळ्या जागा राखल्या जाव्यात. सिडकोने शहरांचा विकास करत असताना सामान्य जनतेच्या प्रश्नांचा विचार करणं आवश्यक आहे. वाहनांसाठी पुरेसे पार्किंग, मैदाने, बागा यांच्यासाठी खुल्या जागा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल, याकडे लक्ष द्यावे.
Other Video On YouTube
तसेच प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी कमी व्हाव्यात, यावर लक्ष द्यावे. मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत असताना पाणी पुरवठ्याचे नियोजन योग्य रितीने व्हायला हवे. त्यासाठी या भागात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करावे. जे प्रश्न सिडकोच्या स्तरावर सोडविता येणे शक्य आहे, असे सर्व प्रश्न नियमांच्या अधीन राहून तातडीने सोडविण्यासाठी पावले उचलावीत. राज्य शासनस्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती मदत करण्यात येईल असे अश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिलं.
Other Video On YouTube
- यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री शशिकांत शिंदे, विभागीय आयुक्त विलास पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
=====================================================
मागील बातम्यावरही दृष्टिक्षेप