महापालिका आयुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 13 सप्टेंबर 2021
नवी मुंबई महापालिका मुख्यालयात काही आंदोलनकर्त्यांनी प्रशासन विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या दालनातील खुर्ची पळविली व मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. यामुळे महापालिका मुख्यालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. सदर घटनेचा निषेध करीत महापालिका अधिकारी, कर्मचारी वृंदाच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना निवेदन देऊन या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची आग्रही मागणी शासनाकडे करावी व महानगरपालिकेतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी अशा प्रकारची विनंती करण्यात आली.त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सकाळच्या सत्रामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना सुव्यवस्थित रितीने कार्यालयीन कामकाज करता यावे याकरिता अभ्यागतांना भेटीची वेळ दुपारी 3 ते 5 नियोजित करण्याबाबत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे यांच्यासह प्रशासन विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, शहर अभियंता संजय देसाई, उप आयुक्त जयदीप पवार, डॉ. बाबासाहेब राजळे, मनोजकुमार महाले, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, अतिरिक्त शहर अभियंता शिऱीष आरदवाड आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Other News On YouTube
नागरी सेवा सुविधा पुरविताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना नियमानुसार वेतन व इतर सुविधा देण्याबाबतही महापालिका प्रशासन नेहमीच सकारात्मक राहिलेले आहे. समान काम समान वेतन याबाबतही प्रशासनाची भूमिका ही कर्मचारी हिताय आहे. तथापि याविषयी कोणत्याही प्रकारे बाजू ऐकू न घेता वा सविस्तर चर्चा न करता आंदोलकांनी ज्या प्रकारे धुडगूस घातला ही बाब कार्यालयीन कामकाजात अडथळा आणणारी व कायदा सुव्यवस्था हातात घेणारी होती. त्यामुळे आंदोलकांविरोधात एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल करण्यात आली आहे. तथापि असा प्रकार अचानक घडल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल खच्ची होण्याचा संभव आहे असे नमूद करीत महानगरपालिकेतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सकाळच्या सत्रामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना सुव्यवस्थित रितीने कार्यालयीन कामकाज करता यावे याकरिता अभ्यागतांना भेटीची वेळ दुपारी 3 ते 5 नियोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार काटेकोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी निवेदन देताना आयुक्तांकडे करण्यात आली. तसेच या घटनेतील आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करून अधिकारी, कर्मचारी यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होण्याकरिता महानगरपालिकेची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचीही विनंती शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.
==================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप