10 वी, 12वीच्या पुरवणी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी दक्ष रहावे

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे निर्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे,13 सप्टेंबर 2021

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने येत्या 16 सप्टेंबरपासून इयत्ता दहावी व 22 सप्टेंबरपासून इयत्ता 12वीची पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. कोवीडच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन या दोन्ही वर्गाच्या परीक्षा निकोप वातावरणात व सुरळीत पार पाडण्यासाठी भरारी पथकांनी दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज दिले.

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 व इयत्ता 12 वीच्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 पुरवणी परीक्षाच्या पार्श्वभूमीवर आज नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीच बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक व प्राथमिक) शेषराव बडे, सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, पोलिस उपनिरीक्षक अलका करंडे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात दहावीची 12 व इयत्ता बारावी परीक्षेची 10 केंद्रे असून दहावीचे 1292 तर बारावीचे 1200 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेतील गैर प्रकार टाळण्यासाठी दोन दक्षता पथके तैनात करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात यावा. शिक्षण मंडळाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच काही गैरप्रकार होणार नाहीत, यासाठी भरारी पथकाने दक्ष रहावे, असे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

कोवीडच्या पार्श्वभूमीवर सॅनिटाझरचा वापर, मास्कचा वापर व सुरक्षित अंतर राखणे याची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

==================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप