(प्रातिनिधीक छायाचित्र)
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 27 जून 2021
कोविडच्या पहिल्या व दुस-या लाटेचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसलेला असून त्यामध्ये काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अनेक कुटुंबांमध्ये आई व वडील असे दोन्ही पालक अथवा त्यापैकी एका पालकाचा मृत्यू होऊन मुले अनाथ झालेली आहेत. त्याचप्रमाणे कोविडमुळे पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्या पत्नीला कौटुंबिक व आर्थिक हानीला आकस्मिकरित्या सामोरे जावे लागलेले आहे. अशी बालके व महिला या शिक्षण, रोजगार व आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या माध्यमातून चार कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
कोविडमुळे अनाथ झालेली बालके व महिला या शिक्षण, रोजगार व आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी अनाथ मुलांना तसेच पती गमावलेल्या पत्नीला मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार समाजविकास विभागाच्या माध्यमातून चार कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
(अ) कोविडमुळे दोन्ही पालक किंवा एक पालक गमावलेल्या मुलांकरिता योजना-
(i) कोविडमुळे दो्न्ही पालक किंवा एक पालक गमावलेल्या मुलांच्या संगोपनाकरिता अर्थसहाय्य. ते बालक अठरा वर्ष पूर्ण करेपर्यंत दरमहा मिळणा-या अर्थसहाय्यास पात्र राहील.
(ii) अनाथ मुलांच्या शिक्षणाकरिता महानगरपालिकेमार्फत आधीपासूनच स्वतंत्र योजना सुरू असल्याने कोव्हीडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या 18 ते 21 वयोगटातील बेरोजगार युवक / युवतींकरिता शैक्षणिक बाबी वगळून इतर बाबींच्या खर्चासाठी दरवर्षी 50 हजार रूपयांते अर्थसहाय्य केले जाणार आहे.
(ब) कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलांकरिता –
(i) कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलेस एकरक्कमी दीड लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
(ii) त्या महिलेला स्वयंरोजगारासाठी, स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलेला एकदाच 1 लाख रूपयांचे अर्थसहाय्य. हे अर्थसहाय्य दोन टप्प्यात असणार आहे.
कोविडमुळे पतीचे निधन झालेली महिला या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील.
- या चारही योजनांची सविस्तर माहिती, सादर करावयाची कागदपत्रे तसेच इतर अनुषांगिक माहिती नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट www.nmmc.gov.in यावर ‘विभाग’ → ‘समाजविकास’ → समाजविकास विभाग सेवा’ → ‘कोव्हीड योजना’ या लिंकवर सहजपणे उपलब्ध आहे.
- अधिक माहितीसाठी उपआयुक्त (समाजविकास), तळमजला, महापालिका मुख्यालय, सेक्टर 15, सीबीडी बेलापूर किंवा समाजविकास विभाग कार्यालय, पहिला मजला, बेलापूर भवन, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर याठिकाणीही कार्यालयीन वेळेत माहिती उपलब्ध होऊ शकेल.
कोविडचा काळ हा सर्वांसाठी अत्यंत कठीण होता. दुर्दैवाने अनेक कुटुंबांनी आपले आप्तस्वकीय कोविडमुळे गमावले. ही झालेली हानी कोणीच भरून काढू शकत नाही. मात्र दोन्ही किंवा एक पालक गमावलेली मुले तसेच पती गमावलेल्या महिला यांना आर्थिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून जगण्याची उभारी देणे आवश्यक आहे. त्यासाठी छोटेसे योगदान म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या 4 नवीन योजना राबविल्या जात असल्याचे सांगत अशा मुलांचा सांभाळ करणा-या व्यक्ती/संस्था यांनी अथवा आपले पती गमावलेले आहेत अशा महिलांनी महानगरपालिकेच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजविकास विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
=======================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप