- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 27 जून 2021
नवी मुंबईतल्या बेलापूर गावाची ओळख सांगणारी आणि सध्या बांधकाम सुरू असणारी कमान आज संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास कोसळली. महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरच ही कमान आहे. मात्र कंत्राटदाराने अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देताच पावसात काम सुरू ठेवल्याची माहिती महापालिकेच्या अभियंत्यांनी दिली.
- (सर्व छायाचित्रे हेमंत कोळी)
नवी मुंबई महानगरपालिकेकडून गावांची ओळख सांगणा-या कमानी गावाच्या प्रवेशद्वारावर उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. बेलापूर गावाला लागून असलेल्या वेशीवरच ही कमान उभारण्यात येत आहे. मात्र आज भर पावसात काम सुरू असताना अचानक कमानीचा काही भाग कोसळू लागला आणि काही क्षणातच संपूर्ण कमानी कोसळून पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
याप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उपअभियंता संजय पाटील यांनी सांगितले की, पावसाळ्यात संपूर्ण काळजी घेवून कामे करण्याबाबत सर्व कंत्राटदारांना सांगण्यात आले आहे. तसेच प्रशासनाला माहिती दिल्यानंतरच काम सुरु करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही कंत्राटदाराने कोणत्याही प्रकारची माहिती न देता सुट्टीच्या दिवशी आणि भर पावसात काम सुरू ठेवले. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाली असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.
=======================================================
मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप