हजारो भुमीपूत्रांचा दिबांसाठी एल्गार

नामकरणासाठी राज्य सरकारला 15 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 24 जून 2021:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला  प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आज हजारोंच्या संख्येने भुमीपूत्र सिडको घेराव आंदोलनात सहभागी झाले होते. विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी सरकारला 15 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. जर तोपर्यंत हा निर्णय झाला नाही तर 16 ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद पाडू असा इशारा लोकनेते दि. बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आला आहे.

आंदोलकांच्या शिष्टमंडळाने सिडको मुख्यालयात सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांची भेट घेवून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आमदार गणपत गायकवाड, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार सुभाष भोईर, आमदार महेश बालदी, कृती समितीचे सदस्य दशरथ भगत, जे.डी. तांडेल, भूषण पाटिल आदि उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण संदर्भात केलेला ठराव रद्द करावा. आणि लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने नवीन ठराव करावा अशा प्रकारची मागणी शिष्टमंडळाने सिडकोकडे केली.

लोकनेते दि.बा.पाटील यांचा 24 जून हा स्मृतिदिन असतो. त्या दिनाचे औचित्य साधत हा दिवस स्मृतिदिन नव्हे तर स्फूर्तिदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय भुमिपूत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार नामकरणाच्या मुद्यावर सिडकोला घेराव घालण्याचे आंदोलन निश्चित करण्यात आले. यासाठी नवी मुंबई, पनवेल, उरण मधील गावांगावांमध्ये गाव बैठका घेण्यात आल्या. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून १० जून रोजी मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे, कल्याण-डोंबिवली इथे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. मात्र या बैठकीतून मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरच ठाम असल्याचे दिसून आले. त्यानंतर मात्र नामकरणाचा हा मुद्दा चांगलाच चिघळला. 24 जूनच्या आंदोलनावर आंदोलकांनी ठाम राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार केवळ गावातच नव्हे तर सोशल मिडियावरही प्रचाराला सुरूवात झाली. पोलिसांनी सिडको मुख्यालयाबाहेर होणा-या या आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही आंदोलक मात्र आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे आंदोलनासाठी महापालिका मुख्यालयाजवळ पाम बीच मार्गावरील नेरूळ- उरण रेल्वे पुलाखाली जागा देण्यात आली. आंदोलनस्थळी येण्यासाठी पोलिसांनी जागोजागी वाहतुकीत बदल करूनही हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले होते.

या आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार व माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, काँग्रेस माजी मंत्री हुसेन दलवाई, माजी मंत्री रवीशेठ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, आमदार राजू पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार रमेश पाटील, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार संदीप नाईक, माजी आमदार योगेश पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाबराव वझे, कॉ. भूषण पाटील, म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जे. डी. तांडेल, दशरथ भगत, मयुरेश कोटकर, यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पक्ष, संघटना, वारकरी सांप्रदाय, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक रायगड, नवी मुंबई, पालघर, ठाणे, शहापूर, नाशिक, कल्याण, डोंबिवली आदी भागातून लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

  • महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा

योगायोगाने आजच्या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत होते. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी आंदोनस्थळीच वटपौर्णिमा साजरी केली. आंदोलनात वटपौर्णिमा साजरी करून आम्हि दि.बा. पाटिल यांचे नाव कसे मोठे होईल हे आम्हि पाहणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी दिली.

  • आंदोलनस्थळी पोलिसांचा फौजफाटा

प्रकल्पग्रस्त आंदोलनकांनी सिडको भवन पर्यंत पोहोचू नये यासाठी आंदोलस्थळावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. नवी मुंबई पोलिसांसह राज्य राखीव दलाची तुकडी, वज्र तैनात करण्यात आले होते.

  • …तर १९८४ च्या पेक्षा मोठी क्रांती घडेल – दशरथदादा पाटील

भूमिपुत्रांसाठी संपूर्ण आयुष्य दिबांनी वेचले. १९८४ सालचा लढा असो किंवा इतर लढे, अशा  अनेक लढ्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.  १९५८ साली कुळकायदा पॅटर्न मुळे देशात न्याय प्रस्थापित झाला त्यामुळे दिबा देशाचे नेते होते. दिबांच्या नेतृत्वाखाली १९८४ च्या लढ्यात मी माजी खा.रामशेठ ठाकूर, द्त्तूशेठ पाटील असे अनेक जणांनी काम केले त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा, वैचारिक प्रगल्भता, संपूर्ण आयुष्य त्यांनी बहुजन समाजासाठी खर्च केले आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिबांचेच नाव देण्यात यावे दुसरे नाव दिले तर १९८४ च्या पेक्षा मोठी क्रांती घडेल.

  • …सरकारला दिबासाहेबांचे नाव दिल्याशिवाय पर्याय उरणार नाही- लोकनेते रामशेठ ठाकूर 

वंदनीय दिबासाहेब यांनी सर्व समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. त्यांच्या नावासाठी सर्व समाज एकवटला आहे. ९९ टक्के समाज आणि विविध पक्ष, संघटना, संस्था, सांप्रदाय दिबांच्या नावासाठी आग्रही आहे. ७० पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला आहे. हा उत्साह कायम ठेवा सरकारला दिबासाहेबांचे नाव दिल्याशिवाय पर्याय उरणार नाही. सिडकोने ठराव बदलून दिबासाहेबांच्या नावाचा करावा आणि राज्य सरकारला पाठवावा.

  • भूमिपुत्रांबद्दल मुख्यमंत्र्यांना जराही आपुलकी नाही – माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण

लोकनेते दि. बा. पाटील यांनी त्यावेळी सरकारच्या विरोधात आंदोलन करून भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिले. माझी जन्मभूमी मुंबई असली तरी माझी कर्मभूमी कोकण आहे, येथील प्रत्येक माणूस दिबांचा आहे. भूमिपुत्रांबद्दल मुख्यमंत्र्यांना जराही आपुलकी नाही. दिबांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिल्याशिवाय भूमिपुत्र गप्प बसणार नाही.

  • भूमिपुत्रांना डिवचू नका तो बंदूकीलाही घाबरत नाही  – काँग्रेसनेते हुसेन दलवाई

बाळासाहेब ठाकरे नेहमी भूमिपुत्रांच्या बाजूने उभे राहिले, स्वर्गात त्यांनाही दिबासाहेबांचे नाव मान्य असेल ते उद्धव ठाकरेंच्या स्वप्नात येतील आणि त्यांना सांगायचे ते सांगतीलच. दिबा फक्त भूमिपुत्रांचे विचार करायचे. विमानतळ होत आहे हि भूमिपुत्रांची मेहरबानी आहे. त्यामुळे भूमिपुत्राला विसरू नका आणि हे पाप करू नका. बाळासाहेब, बॅ . अंतुले यांचे स्मारक भव्य दिव्य व्हावे पण नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव मिळावे. येथील भूमिपुत्र शांत आहे तर तुम्ही त्याला डिवचले तर बंदूकीलाही घाबरत नाही. सन्मानाने चर्चा करा मार्ग काढा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात एकवटली आहे. आणि या लढ्यात दशरथ दादांना सहभागी करून या खऱ्या लढाऊ वाघाला जिवंत केले आहे.

  • नुसती हाक दिली अन् दिबांसाठी जनसागर आला – आमदार प्रशांत ठाकूर

विमानतळाचे काम पूर्ण नसतानाही आणि कोविडचे भयंकर संकट असतानाही मागणी आणि तात्काळ ठराव भूमिपुत्रांच्या माथी मारण्याचे प्रयोजन राज्य सरकारने केले. दिबासाहेबांचे नाव डावलून भूमिपुत्रांना डिवचण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. २००८ सालापासून दिबांच्या नावाची मागणी असतानाही ठाकरे सरकारने प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी जो पर्यंत दिबासाहेबांचे नाव विमातळाला मिळत नाही तो पर्यंत हा लढा आपल्याला सुरूच ठेवून जिंकायचा आहे. दिबासाहेबांची आण ठेवून रायगड पासून मुंबई अगदी नाशिक पर्यंतची दिबासमर्थक या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे नुसती हाक दिली आणि दिबांच्या नावासाठी जनसागर एकवटला आहे.

  • सरकार उद्या असेल का नसेल म्हणून त्या भितीपोटी ठराव- आमदार महेश बालदी   

महाविकास आघाडीचे हे सरकार उद्या असेल का नसेल हे त्यांना माहित नाही म्हणून त्या भितीपोटी ठराव करून नाव देण्याचा घाट घातला आहे. वाढीव गावठाण पक्के करण्यासंदर्भात अनेक वर्षांपासून मागणी आणि संघर्ष सुरु आहे पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या संदर्भात मागणी पत्र देऊन प्रकल्पग्रस्तांना लॉलीपॉप देण्याचा ढोंगी प्रयत्न सुरु केला आहे, त्याला प्रकल्पग्रस्त भुलणार नाही. राज्यात अनेक प्रकल्प आहेत त्यातील दहा प्रकल्पांना बाळासाहेबांचे नाव द्या पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दि. बा. पाटील यांचेच नाव दिले पाहिजे.

  • आम्ही आमच्या हक्क मागत आहोत भीक मागत नाही- आमदार मंदा म्हात्रे 

प्रकल्पसाठी आणि देशाच्या विकासासाठी आमच्या शेतकऱ्यांनी पिकत्या जमिनी दिल्या आहेत. आमच्या घराच्या भिंती, गाड्या दिबासाहेबांच्या आशीर्वादामुळे आहेत, त्यामुळे विरोधकांनी राजकारण करू नये. दिबांचे कार्य महान आहे. त्यामुळे विधिमंडळात २०१९ मध्येच विमानतळाला त्यांचे नाव द्यावे हि मागणी केली आहे. आम्ही आमच्या हक्क मागत आहोत भीक मागत नाही.

  • …तर आंदोलन करायला तुम्हाला भाड्याने लोकं आणावी लागतील  – आमदार गणपत गायकवाड

दिबांच्या नावाची मागणी होत असताना अचानक ठिणगी टाकण्याचे काम झाले आहे. राज्यात महाविकास आघाडीची हुकूमशाही सुरु झाली आहे. त्यामुळे आता मुलाच्या किंवा मुलाच्या लग्नात त्यांच्या मुलांची नाव ठेवण्याची संस्कृती येईल. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्ही आंदोलन केले तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील अशी धमकी देत सुटले. असे असतात का मुख्यमंत्री? हे मुख्यमंत्री आहेत ना असे केले तर कसे राज्य चालवणार. भूमिपुत्र पण शिवसैनिक आहेत हे लक्षात असू द्या. नाही तर ठाणे रायगडमध्ये शिवसेना उरणार नाही. मुख्यमंत्री महोदय खालच्या लोकांचे ऐकून वागाल तर आंदोलन करायला तुम्हाला भाड्याने लोकं आणावी लागतील .

  • भूमिपुत्र कागदावरचे नाही तर खरे वाघ आहेत हे लक्षात ठेवा- संतोष केणे

भूमिपुत्रांनी या आंदोलनातून ताकद दाखवून दिली आहे. नामदार एकनाथ शिंदे पालकमंत्री म्हणून तुम्हाला जाग आली नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विसर पडला का? ठाण्याचे वाघ समजत असाल पण भूमिपुत्र कागदावरचे नाही तर खरे वाघ आहेत हे लक्षात ठेवा.

  • डोक्यावर बसवले तेच तुम्हाला पायदळी तुडवतील  – ह. भ. प. प्रकाश म्हात्रे

उचलली जीभ लावली टाळ्याला असे चालत नाही पण नामकरणात या ठाकरे सरकारने तसेच केले आहे. जनतेने तुम्हाला डोक्यावर बसवले तेच तुम्हाला पायदळी तुडवतील हे लक्षात घ्या तसे नको व्हायला तर विमानतळाला दिबांचे नाव द्या.

  • त्रिमूर्ती आणि लोकप्रतिनिधींची ताकद पाठीशी – जगदिश गायकवाड

लोकनेते रामशेठ ठाकूर, दशरथदादा पाटील, जगन्नाथदादा पाटील या त्रिमूर्तींची आणि आजी माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी, विविध पक्ष संस्था संघटनांची, तरुण, महिला, ज्येष्ठांची ताकद भूमिपुत्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपले तरुण अजून तापले नाहीत ते तापले तर राज्य सरकारला सलो का पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाहीत. भूमिपुत्रांनी घाबरण्याची गरज नाही. जिंकू किंवा मरू विमानतळाला दिबांचेच नाव देऊ. शिवसेनेला आगरी कोळी समाजाने मोठी केले आहे. दिबांचे नाव दिले नाही तर सोलल्याशिवाय राहणार नाही. मधल्या हरामखोरांनो भूमिपुत्र पेटून उठले आहेत हे याद राखा.

  • हडलप्पी करत पित्याच्या नावासाठी महाराष्ट्राची परंपरा संस्कृती मोडीत काढली- जगन्नाथ पाटील 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन बैठक झाल्या. २० जूनच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे वागणे अत्यंत चुकीचे होते. बालहट्टाप्रमाणे वागले, बैठकीतून उठून गेले. आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशी वेदनादायी घटना घडली नसेल पण उद्धव ठाकरे यांनी ती केली. हडलप्पी करत पित्याच्यानावासाठी महाराष्ट्राची परंपरा संस्कृती मोडीत काढली. महाराष्ट्राची परंपरा आईबापाचे नाव देण्याची नाही हे लक्षात घ्या आणि लक्षावधी भूमिपुत्र जागा जागरूक झाला आहे हे ध्यानात ठेवा.

 

  • मुख्यमंत्री पक्षाचा नसतो जनतेचा असतो- आमदार रमेश पाटील  

दिबांनी भूमिपुत्रांसाठी त्याग केला आहे. दिबांच्या कार्याची उंची मोजण्याचे प्रयत्न करू नका. मुख्यमंत्री पक्षाचा नसतो जनतेचा असतो. त्यामुळे भूमिपुत्रांवर अन्याय करू नका. दिबांच्या नंतर भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर करीत आहेत. वेळ पडल्यास यापेक्षा दहा पटीने आंदोलनकर्ते पुढच्यावेळी दिसतील.

  • दिबांच्या नावासाठी समाज काहीही करेल – आमदार राजू पाटील

आंदोलनाची परिस्थिती आणून विखुरलेला आमचा समाज एकत्र करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नामदार एकनाथ शिंदे यांनी केला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. पण विमानतळाला दिबांचेच नाव लागले पाहिजे आणि त्यासाठी समाज काहीही करेल आणि ते तुम्हाला दिसेलच.


  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप