3 हजार 449 नागरिकांचे पहिल्याच दिवशी लसीकरण
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 23 जून 2021:
नवी मुंबईतील 18 वर्षावरील नागरिकांच्या कोविड लसीकरणाला आजपासून सुरूवात करण्यात आली. आज पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या 27 लसीकरण केंद्रांवर 3 हजार 449 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोविड लसीकरणाला गती मिळावी याकरिता लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात आलेली असून सध्या 59 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. त्यामधील वाशी, नेरूळ, ऐरोली येथील सार्वजनिक रूग्णालये, तुर्भे माता बाल रूग्णालय, सेक्टर 5 वाशी येथील आएसआयएस हॉस्पिटलमधील जम्बो लसीकरण सेंटर तसेच 23 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे अशा 27 ठिकाणी 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती.
आत्तापर्यंत 5 लाखांहून अधिक नागरिकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला असून आता 18 वर्षावरील नागरिकांनाही लसीकरण करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी दररोज आपल्या जवळच्या केंद्रांवर थेट जाऊन कोव्हीडपासून संरक्षण देणा-या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
——————————————————————————————————