राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात ‘संकल्प दिवस’

केंद्र सरकारच्या विरोधात राज्यभरात होणार आंदोलन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 18 जून 2021:

खा. राहुल गांधी यांचा 19 जून रोजी वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. कोरोनाचे संकट असल्याने वाढदिवसाला उत्सवी स्वरुप न देता गोरगरिब जनतेला रेशन, अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप तसेच कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांनाही मदत करण्याचा संकल्प काँग्रेसने केला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

पंतप्रधानांनी कोरोना काळात जनतेच्या जिवीताशी खेळ केला असून ‘आपली प्रतिमा संवर्धन’ करण्यासाठी इव्हेंटबाजीवरच जास्त लक्ष दिले. कोरोनाने देशात विदारक चित्र असताना वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करणे काँग्रेस विचाराला पटणारे नाही. हे लक्षात घेऊन वाढदिवस हा ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस नेते व पदाधिकारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत तर पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, एलपीजी गॅसच्या महागाईविरोधात महिला काँग्रेस गॅस कार्यालय आणि पेट्रोल पंपासमोर संकल्प करणार आहेत. युवक काँग्रेस/एनएसयुआयचे कार्यकर्ते यावेळी बेरोजगारीविरोधात आंदोलन करून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतील. देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसून २०२४ साली राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प या दिवशी केला जाणार आहे, असेही पटोले यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना आरजी किटचे वाटप

राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काँग्रेसच्यावतीने आज गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य असलेल्या ‘आरजी किट’ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे. आ. कुणाल पाटील, उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, देवानंद पवार आदी उपस्थित होते. एनएसयुआयचे संदीप पांडे यांनी आरजी किट वाटपाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता.

——————————————————————————————————