कोविड चाचणी रिपोर्ट एका क्लिकवर

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोविड पोर्टलवर विशेष सुविधा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 18 जून 2021:

कोविड चाचणी केल्यानंतर चाचणीचा रिपोर्ट संबंधित व्यक्तिला सहजपणे उपलब्ध व्हावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोविड पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिक एका क्लिकवर आपला कोविड रिपोर्ट पाहू शकतात तसेच त्याची प्रिंटही काढून घेऊ शकतात.

याशिवाय कोविड टेस्ट करताना नागरिकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस संदेशव्दारेही लिंक पाठविली जात असून त्या लिंकवर क्लिक केल्यानंतरही कोविडचा रिपोर्ट उपलब्ध होत आहे.

कोविड रिपोर्ट कसा मिळणार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmccovidcare.com या संकेतस्थळावर विशेष सुविधा निर्माण करण्यात आली असून या वेबसाईटवर covid 19 test report सेक्शनमध्ये ज्या व्यक्तीची कोविड टेस्ट केलेली आहे, त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक टाकल्यास त्याच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक अपलोड करून लगेच कोविड टेस्टींग रिपोर्ट प्राप्त होत आहे. या रिपोर्टची प्रिंट काढून घेणेही सहजशक्य आहे.

याशिवाय कोविड टेस्ट करताना नागरिकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस संदेश प्राप्त होत असून त्या टेस्टचा कोविड रिपोर्ट पोर्टलवर अपलोड झाल्यानंतरही एसएमएस संदेश येत असून त्या एमएसएस मधील लिंकवर क्लिक केल्यानंतरही कोविडचा रिपोर्ट उपलब्ध होत आहे.

महानगरपालिकेची रूग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे तसेच एपीएमसी मार्केट, रेल्वे स्टेशन्स येथील कोविड टेस्टींग सेंटरमध्ये अँटिजेन अथवा आरटी-पीसीआर टेस्ट केलेल्या कोणत्याही व्यक्तीचा रिपोर्ट या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

——————————————————————————————————