नवी मुंबई महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यादी जाहीर केली
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 12 जून 202
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार यंदा 475 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा सी-1 प्रवर्गामध्ये मोडणा-या 65 इमारती, इमारत रिकामी करून संचरचनात्मक दुरूस्ती करणे अशा सी-2 ए प्रवर्गामध्ये मोडणा-या 94 इमारती, इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा सी-2 बी प्रवर्गामध्ये मोडणा-या 259 इमारती तसेच इमारतीची किरकोळ दुरूस्ती अशा सी-3 प्रवर्गामध्ये मोडणा-या 57 इमारती, अशाप्रकारे एकूण 475 धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली आहे.
- धोकादायक इमारतींची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर ‘विभाग’ सेक्शनमध्ये ‘अतिक्रमण विभाग’ माहितीच्या सेक्शनमध्ये सहज उपलब्ध आहे.
घोषित इमारतींमध्ये वास्तव्य करणारे मालक / भोगवटादार यांना ते राहत असलेली इमारत निवासी / वाणिज्य वापराकरिता धोकादायक असलेबाबत आणि या इमारतींमधील निवासी / वाणिज्य वापर तात्काळ थांबविणेबाबत तसेच धोकादायक इमारतींचे बांधकाम विनाविलंब तोडून टाकणेबाबत महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांचेकडील 5 नोव्हेंबर 2015 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार लेखी सूचना / नोटीस देण्यात आलेल्या आहेत. सी-1 प्रवर्गातील इमारतीची विदयुत व जल जोडणी खंडीत करण्यात येईल असेही यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.
अशा धोकादायक घोषित इमारतींचे मालक अथवा भोगवटादार यांना सूचित करण्यात येते की, ते रहात असलेल्या इमारतीचा वापर करणे धोकादायक असल्याने इमारत कोसळून जिवीत व वित्तहानी होण्याचा संभव लक्षात घेऊन सदर इमारतीचा / बांधकामाचा निवासी / वाणिज्य वापर त्वरीत बंद करावा आणि सदरची इमारत / बांधकाम त्वरीत विनाविलंब तोडून टाकावे. अशा प्रकारची कार्यवाही न केल्यास, सदर इमारत / बांधकाम कोसळल्यास होणा-या नुकसानीस फक्त संबंधित जबाबदार असतील, नवी मुंबई महानगरपालिका यास जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे.
पावसाळा कालावधीत धोकादायक झालेल्या इमारतींचा / घरांचा वापर करणे धोक्याचे आहे. त्यामुळे जिवित व वित्तहानी होऊ शकते. म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा / घरांचा रहिवास / वापर तात्काळ थांबविण्यात यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे, अन्यथा दुर्देवीरित्या अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधिताची राहील याची नोंद घेण्यात यावी, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
========================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप