नवी मुंबईत भूमिपुत्रांचे मानवी साखळी आंदोलन

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद चिघळला

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 10 जून 2021:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दि.बा.पाटील यांचं नावं देण्यात यावे या मागणीसाठी आज नवी मुंबई, पनवेल, मुंबईत मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. भर पावसातही सामाजिक अंतर राखत भूमिपूत्रांनी शांततेत आंदोलन केले. या लढयात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक संघटना, प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटना लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र आले होते.

नवी मुंबईत बेलापूर इथल्या मेट्रो रेल्वे पूल ते दिघा पर्यंत 21.5 किलोमीटरची मानवी साखळी करण्यात आली होती. सकाळी 11 ते 12 या वेळेत हजरो भूमिपुत्रांनी एकत्र येते नेमून दिलेल्या टप्यात आंदोलन केले. सध्याची कोरोना विषाणूच्या संसर्गाची पार्शवभूमी लक्षात घेवून गर्दी होवू नये या साखळी मार्गाचे 21 टप्पे करण्यात आले होते त्यामध्ये नवी मुंबईतली 29 गावं आणि 12 पाड्यांमधील हजारो नागरिक सहभागी झाले होते. काही ठिकाणी पारंपरिक वेषात दि.बा. पाटील यांच्या नावाच्या जयघोष करण्यात येत होता. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने पार पडलेल्या या आंदोलनात माजी नगरसेवक, स्थानिक आमदार यांनीही सहभागी होत विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याची मागणी केली.

सिडकोने नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये संमत करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांमध्ये सिडको आणि राज्य सरकारविरोधात असंतोषाची भावना निर्माण झाली. गावागावांमध्ये गाव मिटिंग घेवून आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. त्यानुसार आज हे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा लढा अधिक व्यापक करण्यासाठी पुढच्या टप्यात दि.बांच्या स्मृतिदिनानिमित्ता 24 जून रोजी सिडकोला घेराव घातला जाणार आहे.


  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप