- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 29 मे 2021
कोविड विरोधी लढ्यामध्ये वृत्तपत्रे व वृत्तचित्रवाहिन्यांनी कोविडविषयक माहिती जनतेपर्यंत पोहचवून जनजागृतीविषयी महत्वाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे कोरोना संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून वृ्त्त संकलन व प्रसारणाचे प्रभावीपणे काम करणा-या वृत्तपत्रे व वृत्तचित्रवाहिनी प्रतिनिधींचे कोविड लसीकरण करण्याचा उपक्रम नवी मुंबई महापालिकेने आज राबविला. बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात ४० पत्रकारांचे लसीकरण करण्यात आले. केवळ पत्रकारांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविणारी नवी मुंबई महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.
सीबीडी बेलापूर येथील अपोलो रूग्णालयामध्ये सीएसआर निधीतून नवी मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षाशी संलग्न विविध वृत्तपत्रे आणि वृत्तचित्रवाहिनी प्रतिनिधी व कॅमेरामन यांचे कोविड लसीकरण महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, मुख्य जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे आणि अपोलो रुग्णालयातील डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पार पाडले. दुपारी 12.30 ते 5 या वेळेत, 40 वृ्त्तपत्र, वृत्तत्रवाहिनी प्रतिनिधी व कॅमेरामन यांनी कोविड लसीचा डोस घेतला.
यावेळी ठाणे लोकसभा सदस्य खासदार राजन विचारे, शिवसेना नेते विजय चौगुले, शिवसेना शहरप्रमुख विजय माने, विठ्ठल मोरे, दिलीप घोडेकर, द्वारकानाथ भोईर आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रसार माध्यमांच्या कोविड काळातील कार्याची जाणीव ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेने माध्यम प्रतिनिधी व कॅमेरामन यांच्यासाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित करून पुढाकार घेतल्याबद्दल पत्रकारांनी आभार व्यक्त केले.
=======================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप