केवळ सरकारी कोविड लसीकरण केंद्रांसाठी सुविधा
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई , 26 मे 2021:
कोविड-19 संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली. या मोहिमेमध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींना कोविन डिजिटल मंचाद्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने वेळनिश्चितीची सुविधा देण्यात आली होती. आता मात्र थेट लसीकरण केंद्रावरही नोंदणी होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी प्रत्यक्ष लसीकरणासाठी गेल्यानंतर त्या केंद्रावर नोंदणी तसेच वेळनिश्चिती करणारे वैशिष्ट्य कोविन अॅपमध्ये आता अंतर्भूत करण्यात आले आहे. मात्र, सध्या हे वैशिष्ट्य फक्त सरकारी कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवरील लसीकरणासाठी वापरणे शक्य होणार आहे.
1 मार्च 2021 रोजी राष्ट्रीय लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर, 45 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना फक्त कोविन डिजिटल मंचाद्वारे ऑनलाईन नोंदणी तसेच लसीकरणाचा दिवस-वेळ निश्चितीची सुविधा देण्यात आली होती. या प्राधान्य गटांसाठी प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवरील नोंदणी आणि वेळनिश्चितीची सुविधा नंतर यात समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर, लसीकरणासाठी 1 मे 2021 पासून 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी सुरु केली. 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींना फक्त ऑनलाईन पद्धतीने वेळनिश्चितीची सुविधा मंजूर करण्यात आली होती.
यासंदर्भात, 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाबाबत राज्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विविध सादरीकरणे दिल्यानंतर आणि प्रतिसादात्मक माहिती पुरविल्यानंतर, केंद्र सरकारने आता कोविन डिजिटल अपवर 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी तसेच इतर सुविधांच्या माध्यमातून नोंदणी करण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरनेट किंवा स्मार्टफोन किंवा मोबाईल फोन नाहीत अशा लोकांना याचा फायदा होणार आहे.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी दिवसाच्या शेवटी जर ऑनलाईन नोंदणी करून वेळ निश्चित केलेले लाभार्थी काही कारणाने त्यांच्या वेळेवर येऊ शकले नाही तर लसीच्या काही मात्रा शिल्लक राहतात. अशा प्रसंगी, लस वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी, प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नोंदणी करून काही लाभार्थ्यांना लस देणे गरजेचे असते.
खासगी केंद्रांना केवळ ऑनलाईन वेळनिश्चिती कालावधीसह त्यांच्या लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर करावे लागेल.
प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावरील किंवा सहयोगी संस्थांच्या माध्यमातून नोंदणी तसेच वेळनिश्चितीची सुविधा वापरण्याची पद्धत आणि मर्यादा याबाबत संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांनी घेतलेल्या निर्णयांची कडक अंमलबजावणी करण्यासाठीच्या स्पष्ट सूचना सर्व जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना दिले आहेत.
सुलभीकृत केंद्रांशी संलग्न लाभार्थ्यांना लसीकरण सेवा पुरविण्यासाठी संपूर्णपणे आरक्षित सत्रे देखील आयोजित करता येऊ शकतील. जेव्हा अशी संपूर्णपणे आरक्षित सत्रे आयोजित केली जातील,तेव्हा पुरेशा संख्येत उपस्थित राहण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न केलेच पाहिजेत.
लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी, 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावरील किंवा सहयोगी संस्थांच्या माध्यमातून नोंदणी तसेच वेळनिश्चितीची सुविधा सुरु करताना, सर्व प्रकारची सावधगिरी बाळगावी आणि आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना दिले आहेत.
——————————————————————————————————