नवी मुंबई विमानतळाच्या नावासाठी सिडकोबाहेर एकपात्री जनआंदोलन

विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची

शैलेश घाग यांची मागणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 10 मे 2021:

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नावाचा वाद आता चांगलाच चिघळू लागला आहे. सिडको संचालक मंडळाने नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर रायगड जिल्ह्यात याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहे.  विमानतळाला माजी खा. दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात यावे या मागणीसाठी आता ग्रामस्थच नव्हे तर नवी मुंबईतील नागरिकही आंदोलन करू लागले आहेत. याच मागणीसाठी नेरूळ येथील रहिवासी शैलेश घाग यांनी आज सिडको भवनबाहेर एकपात्री जनआंदोलन केले. आपला विनंतीचा अर्ज त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह सिडको संचालकांकडे पाठविला आहे.

गेल्या आठवड्यात सिडकोने नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बोर्ड मीटिंग मध्ये संमत करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यानंतर या नामांतरला ग्रामस्थांकडून विविध मार्गांनी विरोध होवू लागला आहे. अशातच आता सामान्य नागरिकही या नामकरणाच्या विरोधात उतरल्यामुळे हा लढा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

सिडको हे राज्य शासनाचे अंगीकृत महामंडळ आहे. ज्या माध्यमातून अनेक केंद्रीय तसेच राज्यस्तरीय प्रकल्प शहराच्या विकासासाठी प्रत्यक्ष अंमलात आणते. एवढे महत्त्वाचे महामंडळ हे संचालक मंडळात कोणतेही लोकनियुक्त वा राजकिय पक्षाचे प्रतिनिधी नसताना केवळ आयएएस अधिकारी जे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष म्हणून प्रशासकीय कामकाज चालवण्यास नियुक्त असतात तेच असा नामांतराबाबतचा ठराव पटलावर ठेऊन संमत कसे काय करू शकतात? खरे तर वैधानिक दृष्टया लोकशाही संपन्न देशातील हे बहुदा अनोखे उदाहरण असावे जे की बेकायदेशीर ठरवले पाहिजे असे मत शैलेश घाग यांनी या विनंती अर्जात व्यक्त केले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची  उभारणी ही भविष्यातील दळणवळण व वाहतूक व्यवस्था वाढता पसारा लक्षात घेता हा प्रकल्प होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र सिडकोच्या स्थापनेपासूनच म्हणजे ठाणे, पनवेल व उरण तालुक्यातील ९५ गावांच्या जमिनीचे अधिग्रहण करताना दिलेली त्रोटक व अपूर्ण आश्वासने आणि मोबदला आदींविरोधात त्यानंतरच्या काळात झालेल्या संघर्षानंतर पुन्हा त्या आश्वासनांमध्ये दुरुस्त्या, पुन्हा त्याच आश्वासनांनी पायमल्ली अशी जुलमी पद्धत सिडकोची आजतागायत राहिलेली आहे हा माझा आरोप नसून व्यक्तिगत एक सर्वसामान्य नवी मुंबईकर नागरिक म्हणून माझा आरोप असल्याचंही घाग यांनी म्हटलं आहे.

आपल्या या एकपात्री जनआंदोलनाला नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत आणि अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिल्याचे शैलेश घाग यांनी सांगितले.
——————————————————————————————————-