नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ‘ऑक्सिजन वॉर रूम’

ऑक्सिजन पुरवठा आणि साठ्याचा दर 3 तासांनी आढावा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 27 एप्रिल 2021:

नवी मुंबईत ऑक्सिजनअभावी कोविड रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिका मुख्यालयात ‘ऑक्सिजन वॉर रूम’ सुरू करण्यात आली आहे. उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली 6 जणांची टीम ऑक्सिजन वॉर रूम मध्ये कार्यान्वित करण्यात आली असून येथून सकाळी 7 ते 11 या वेळेत महानगरपालिका व खाजगी अशा सर्व कोविड रूग्णालयीन सुविधेतील ऑक्सिजन साठ्याचा दर 3 तासांनी आढावा घेतला जात आहे. तसेच कुठे अडचण असल्यास उपलब्ध ऑक्सिजन साठ्याची माहिती घेऊन ती दूर करण्यासाठी तत्परतेने आवश्यक उपाययोजना केली जात आहे.

उत्पादकाकडून एमआयडीसी मध्ये टँकरमधून येणारा ऑक्सिजनचा साठा तेथील पुरवठादार कंपन्यांच्या सिलिंडरमध्ये जमा केला जातो व त्याचे वितरण केले जाते. त्याठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी 24 x 7 कार्यरत असून त्यांच्यामार्फत ऑक्सिजनचा साठा आल्यानंतर तो महानगरपालिकेच्या सिलेंडर्समध्ये भरून घेणे व नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी रूग्णालयाचे आलेले सिलेंडर्सही प्राधान्याने भरून घेण्यासाठी सहकार्य करण्याचे काम केले जाते.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रत्येक कोविड रूग्णालयीन सुविधांच्या ठिकाणी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी यांनी संबंधित रूग्णालयामध्ये किमान 24 तास पुरेल एवढा साठा कायम उपलब्ध करून ठेवण्याच्या दृष्टीने रूग्णालयीन व्यवस्थापनाशी नियमित संपर्क ठेवावा व त्यात अडचणी येत असल्यास ऑक्सिजन वॉर रूमशी संपर्क साधून ऑक्सिजनची पूर्तता करून घेईपर्यंत पाठपुरावा करावा असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व रूग्णालयीन नोडल अधिकारी यांना दिले आहेत. शिवाय याचा दैनंदिन आढावा दररोज संध्याकाळच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आयुक्तांमार्फत घेतला जात आहे.

ऑक्सिजन साठा नियंत्रक नोडल अधिकारी ऑक्सिजन पुरवठादारांशी नियमित संपर्कात राहून व त्यांच्या कंपनीस प्रत्यक्ष भेट देऊन शासनाची मदत घेत त्या ठिकाणाहून आवश्यक टँकर भरून घेतले जातील अशा प्रकारे नियोजन केले जात आहे.

सध्या महानगरपालिकेमार्फत वाशी येथे सिडको एक्झिबिशन सेंटर, नेरूळ येथील डॉ.डि.वाय.पाटील रूग्णालय व एमजीएम रूग्णालय कामोठे या ठिकाणी आयसीयू व व्हेटिलेटर्स बेड्सची सुविधा कार्यान्वित आहे. याशिवाय वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेटर, राधास्वामी सत्संग व एक्पोर्ट हाऊस याठिकाणी असलेल्या डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर्समध्येही ऑक्सिजन बेड्सकरिता ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रात 26 खाजगी रूग्णालयांमध्ये कोव्हीड रूग्णांवर उपचार केले जात असून तेथील ऑक्सिजन पुरवठ्यावरही महानगरपालिकेमार्फत कायम लक्ष ठेवले जात आहे.

——————————————————————————————————