‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नव्याने शासनाचे निर्बंध
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 20 एप्रिल 2021:
मागील काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होत असलेली गर्दी आणि त्यातून वाढत असलेला कोरोनाचा धोका टाळण्यासाठी या सेवांच्या वेळांतही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने सकाळी 7 ते 11.30 वाजेपर्यंतच ग्राहकांसाठी उघडी ठेवण्यात येणार आहेत त्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत या दुकानांमधून घरपोच सेवा दिली जाणार आहे. आज 20 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून 1 मे ला सकाळी 7 वाजेपर्यंत हा नियम कायम राहणार आहे.
साथीचे रोग कायदा १८९७ च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार सदर बदल करण्यात येत असल्याची माहिती पत्रकाद्वारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे.
वेळांमध्ये होणारे बदल कोणते आहेत-
- सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी 7 वाजेपासून 11.30 पर्यंत उघडे राहतील.
- वरील नमूद दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 पर्यंत मुभा असेल, परंतु आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते.
- स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते.
- या आदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टीं व्यतिरिक्त इतर सर्व अटी व नियम 13 एप्रिल 2021 रोजी राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसारच असतील.
—————————————————————————————————-इतरही बातम्यांचा आढावा