लॉर्ड्स हॉस्टेल व सिडको सेंटरमध्ये एकूण 490 खाटा
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 12 एप्रिल 2021:
कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना त्यांच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने रूग्णालयीन सुविधांमध्ये वाढ करण्यात आली असून नवी मुंबईत दोन नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. खारघर सेक्टर 19 येथील लॉर्ड्स अँड मेलबोर्न हॉस्टेल येथे 240 खाटांचं तर सिडको एक्झिबिशन सेंटर सेक्टर 30 वाशी येथील 1200 बेड्स क्षमतेच्या कोव्हीड सेंटरच्या बाजूलाच 250 बेड्स क्षमतेचे ‘कोव्हीड केअर सेंटर 2’ सुरू करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे एकूण 490 खाटांची ही सेंटर सुरू करण्यात आली आहेत.
खारघर सेक्टर 19 येथील लॉर्ड्स अँड मेलबोर्न हॉस्टेल
10 मार्चनंतर कोरोना बाधितांची मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार ‘मिशन ब्रेक द चेन’ च्या अधिक प्रभावी अंमलबजावणीस सुरूवात करण्यात आलेली आहे. यामध्ये महत्वाचा भाग असलेल्या रूग्णालयीन सुविधा वाढीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. याकरिता कोव्हीडचा प्रसार कमी होऊ लागल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली कोव्हीड केअर सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून त्या सोबतच काही नवीन ठिकाणीही कोव्हीड सेंटर्स निर्माण करण्यात येत आहेत.
याव्यतिरिक्त महानगरपालिकेच्या वाशी, घणसोली व ऐरोली विभागातील शाळांमध्येही कोविड सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने कामे गतीने सुरू असून काही इतर ठिकाणीही कोविड सेंटर उभारली जात आहेत.
इतरही बातम्यांचा मागोवा