- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई,12 एप्रिल 2021:
कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थी हिताचा विचार करून राज्यातल्या दहावी, बारावीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 12 वीची परिक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर 10 वी ची परिक्षा जून महिन्यात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिक्षण विभागाच्या बैठकीनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी टि्वट करून दिली.
विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध राजकीय संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि तंत्रज्ञांशी चर्चेनंतर परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षिततेचा विचार करून सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि केंब्रिज बोर्डांनीही आपल्या परीक्षांच्या वेळापत्रकाचा फेरविचार करावा, असं आवाहन गायकवाड यांनी केले आहे.
12 वी च्या परिक्षा घोषित सुधारित कार्यक्रमानुसारच घेतल्या जाव्यात. हे करतांना 12 वीच्या विद्यार्थ्यांना पुढे नीट, आय. आय.टी. जेईई अशा परीक्षा देवून उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असतो हे लक्षात घेवून त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.
——————————————————————————————————-