कन्टेनमेंट झोनच्या नियमांचे उल्लंघन करणा-या 5 सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 10 एप्रिल 2021

मायक्रो कन्टेनमेंट झोनच्या नियमांचे उल्लंघन करणा-या नवी मुंबईतील पाच सोसायट्यांवर नवी मुंबई महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून सोसायटी रहिवाशांनी कन्टेंनमेंट झोनच्या नियमांचे कटेकोर पालन करावे, असे आवाहन सोसायटीच्या कमिटी पदाधिकारी करू लागले आहेत.

बेलापूर विभागातील सेक्टर 25 नेरूळ येथील विजयगड सोसायटी, वाशी विभागातील सेक्टर 1 मधील गणेश टॉवर आणि घणसोली विभागात सेक्टर 6 मधील महावीर मल्हार सोसायटी त्याचप्रमाणे तुर्भे विभागात सेक्टर 9 सानपाडा येथील मिलेनियम टॉवर मधील ए 1 आणि ए 5 या दोन इमारती अशाप्रकारे एकूण 5 सोसायट्यांवर प्रत्येकी  10 हजार रुपये तसेच सेक्टर 15 बी टाईप मधील घराच्या सुरू असलेल्या बांधकामाठिकाणी कार्यरत मजूरांची कोरोना टेस्ट करून घेतलेली नसल्याने बांधकाम मालकावर 10 हजार रुपये अशी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

एखाद्या सोसायटीमध्ये पाचपेक्षा जास्त रूग्ण असल्यास ती सोसायटी मायक्रो कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत असून सोसायटी कन्टेनमेंट म्हणून जाहीर झाली असल्याचे पत्र संबंधित सोसायटीच्या पदाधिका-यांना देण्यात येत आहे व सोसायटीच्या प्रवेशव्दारावर तशा प्रकारचा फलकही दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात येत आहे.

अशा मायक्रो कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेल्या सोसायटीमधून कोणत्याही नागरिकाचा आतमध्ये प्रवेश अथवा बाहेर जाणे प्रतिबंधीत आहे. या नियमाचा भंग झालेला आढळल्यास सोसायटीला पहिल्या वेळी रक्कम 10 हजार रुपये दंड करण्यात येत आहे. तसेच दुसऱ्या वेळेस रक्कम 25 हजार रुपये व तिसऱ्या वेळेपासून पुढे प्रत्येक वेळी रक्कम 50 हजार रुपये इतका दंड आकारण्यात येत आहे.

========================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप