आयफेल टॉवरपेक्षाही उंच असलेल्या चिनाब नदीवरील पूलाच्या कमानीचे काम पूर्ण

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी दिल्‍ली, 6 एप्रिल 2021:

काश्मीर खोऱ्याला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणाऱ्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला (युएसबीआरएल) रेल्वे जोड प्रकल्पातील सर्वात अवघड टप्पा असलेल्या पूलाच्या कमानीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेने हा टप्पा पूर्ण केला असून चिनाब नदीवर 359 मीटर उंचीवर हा कमानीचा आकार पूर्ण झाला आहे.

चिनाब नदीवर उभारण्यात येत असलेला हा पूल 1315 मीटर लांबीचा आहे. रेल्वे  प्रकल्पांपैकी स्थापत्त्य अभियांत्रिकी दृष्टीकोनातून सर्वात मोठे आव्हान असलेला हा एक प्रकल्प आहे. कटरा ते बनिहाल दरम्यानच्या 111 किमी लांबीचा टप्पा पूर्ण करण्यासाठी हा टप्पा महत्वाचा मानला जात आहे. 5.6 मीटर लांबीचा धातूचा शेवटचा तुकडा सर्वोच्च टोकाला बसवण्यात आला असून नदीच्या काठाच्या दोन बाजूला असलेल्या भागांना तो  जोडण्यात आला. हे काम पूर्ण झाल्यानंतर आधारासाठीच्या केबल हटवणे, कमानीच्या सांगाड्यात कॉन्क्रीट भरणे,पुलाचा पोलादी त्रिकोणी  आधार उभारणे, रूळ बसवणे यासारखी कामे हाती घेण्यात येतील.

फ्रान्स मधल्या आयफेल टाँवरपेक्षा याची उंची 35 मीटरने जास्त आहे. ताशी 266 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यालाही हा पूल तोंड देऊ शकेल.

या कमानीचे वजन 10,619 मेट्रिक टन आहे. ओव्हरहेड केबल क्रेनद्वारे कमानीचे भाग बसवण्याचे काम  भारतीय रेल्वेने प्रथमच केले आहे. बांधकामातल्या बारकाव्यासाठी अतिशय अद्ययावत ‘टेकला’ सॉफ्टवेअरचा उपयोग करण्यात आला. या पूलाचा पाया सुरक्षित राखण्यासाठी बंगलोरची भारतीय विज्ञान संस्था काम करत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेशी सल्ला मसलत करून भारतात प्रथमच अशाप्रकारे पूल उभारण्यात येत आहे.

——————————————————————————————————