- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 22 मार्च 2021:
लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हटलं जातं. एकदा गाठ बांधली की ती सात जन्मासाठीच. त्यामुळे विवाह सोहळा हा आयुष्यात एकदाच येतो असं मानलं जातं. पण त्या दोघांनी पुन्हा विवाहगाठ बांधली. विशेष म्हणजे सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात सामाजिक भान राखत कमीत कमी आप्तस्वकियांच्या उपस्थित त्यांनी लग्नगाठ पुन्हा बांधली. पाच दशकांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. निमित्त होते त्यांच्या विवाहाच्या 50 व्या वाढदिवसाचं.
दिवाळे गावातल्या 71 वर्षिय बळीराम शिमग्या कोळी आणि त्यांच्या 56 वर्षिय पत्नी लीला बळीराम कोळी या दाम्पत्यांनी 21 मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या मुहूर्तावर अत्यंत साध्या पद्धतीने, मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत आपल्या आयुष्याची पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आणि पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या गोड मंगलमय आठवणींचा पेटारा उघडला. लग्नाला उपस्थित घरातल्या मंडळींच्या हातांवर गुलाबपाणी ऐवजी सॅनिटायझर लावून स्वागत करण्यात आले.यावेळी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या त्यांच्या असंख्य नातेवाईकांनी उभयतांना प्रेमळ शुभेच्छा दिल्या.
कोरोना संकटाच्या या काळात विवाहसोहळ्यादरम्यान सामाजिक भान जपण्याचा आदर्श त्यांनी आजच्या युवापिढीसमोर मांडला आहे. सरकारच्या मी जबाबदार या मोहिमेला पाठिंबा देत सामाजिक जबाबदारीचे ध्येय बाळगून स्वतः मास्क वापरत इतरांना सुद्धा मास्क वापरण्याचा मौलिक सल्ला या दाम्पत्याने दिला आहे.
आजच्या काळात तरुण पिढी प्रेमात पडतात. लग्न करतात. मात्र काही काळातच त्यांच्यात विसंवाद सुरु होतो आणि अनेकदा घटस्फोटापर्यंत पाळी जाते. अशा तरुण जोडप्यांना आदर्श वाटावा असे उदाहरण कोळी दाम्पत्यांनी ठेवले आहे.
लग्न ही एकमेकांना समजून घेण्याची, सावरण्याची आणि सदैव सोबत राहण्याची गोड गोष्ट आहे. जसं जसा वेळ सरकतो, तसे विवाहाचे बंधन अधिक घट्ट व्हायला हवे आणि आयुष्याचा खरा आनंद अनुभवायचा असतो असे कोळी दाम्पत्याने यावेळी सांगितले.
==================================================
- इतर बातम्यांवरही दृष्टिक्षेप