महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, २१ जानेवारी २०२१
जुईनगरमधील विरंगुळा केंद्रात येणाऱ्या ज्येष्ठांना ज्या ज्या समस्या जाणवतील, त्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. जुईनगरमधील ज्येष्ठ नागरिकांनी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणिस संतोष शेट्टी व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्यासोबत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. त्यावेळी आयुक्त अभिजित बांगर यांनी तात्काळ पालिका प्रशासनाला निर्देश दिले.
जुईनगर सेक्टर २४ परिसरात चिंचोली तलावाजवळील उद्यानात महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विरगुंळा केंद्राची निर्मिती केलेली आहे. या केंद्रात स्थानिक परिसरातून येणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या महिलांकडून स्वतंत्र शौचालयाची मागणी सातत्याने केली जात आहे. स्वतंत्र शौचालय नसल्याने महिलांची कुचंबना होत आहे. ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी या केंद्रात व बाहेरील परिसरात सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहे. या केंद्रासमोरच उद्यानात महापालिका प्रशासनाने खेळणी बसविली आहेत. त्यामुळे महिलांना केंद्राबाहेरील जागेचा वापर करता येत नाही. ही खेळणी उद्यानात अन्यत्र हलविल्यास महिलांना केंद्राबाहेरील जागेचा वापर करता येईल. या केंद्रात येणाऱ्या ज्येष्ठ महिलांच्या मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक विचार करून त्यांना सुविधा देण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी पालिका आयुक्तांकडे केली.
कोरोनामुळे विरंगुळा केंद्र पालिका प्रशासनाने बंद केल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. कोरोना आता आटोक्यात आला असून उद्यानेही सुरू झाली आहेत. त्यामुळे विरंगुळा केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी यावेळी ज्येष्ठांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली. समस्या जाणून घेतल्यावर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी तात्काळ फोन करून संबंधित अधिकारी यांना समस्या सोडविण्याचे आदेश दिल्याचे रविंद्र सावंत यांनी सांगितले.
यावेळी शिष्टमंडळात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अंकुश नलावडे, मुकुंद कांबळे, खजिनदार बुद्देशक दरेकर, बद्रिके, केशव गांगुर्डे, अशोक हिंजे, बाबुराव जाधव सहभागी झाल्याची माहिती रविंद्र सावंत यांनी दिली.
========================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप